अफगाणमध्ये महिलांना शिकता येणार! तालिबानी शिक्षणमंत्र्यांची घोषणा
![Women can learn in Afghanistan! Taliban education minister's announcement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/EsFL-WtUYAIDM4a.jpg)
काबूल – अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीत महिलांवर अत्याचार केले जात असल्याच्या बातम्या समोर येत असताना आता तालिबानच्या कार्यवाहक उच्च शिक्षणमंत्र्यांनी याच महिलांबाबत मोठी घोषणा केली आहे. अब्दुल बाकी हक्कानी यांनी म्हटले आहे, की तालिबानच्या राजवटीत मुलींना विद्यापीठात शिक्षण घेता येईल. मात्र त्यासाठी मुला-मुलींचे वर्ग एकत्र चालविता येणार नाहीत. १९९०च्या राजवटीत तालिबान मुलींच्या शिक्षणाच्या पूर्णपणे विरोधात होते. परंतु यावेळी अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवल्यापासून तालिबान सतत आपल्या धोरणात बदल करताना दिसत आहे.
तालिबान सरकारमधील कार्यवाहक उच्च शिक्षणमंत्री अब्दुल हक्कानी म्हणाले की, अफगाणिस्तानचे लोक शरिया कायद्यानुसार उच्च शिक्षण घेऊ शकतील. परंतु या काळात मुले आणि मुलींचे वर्ग स्वतंत्रपणे चालतील. तसेच तालिबानला इस्लामिक अभ्यासक्रम तयार करायचा आहे. तो अभ्यासक्रम आपल्या इस्लामिक, राष्ट्रवादी आणि ऐतिहासिक मूल्यांनुसार असेल. त्याचबरोबर इतर देशांशी स्पर्धा करण्यासही सज्ज असेल. यादरम्यान त्यांनी अफगाणिस्तानातील महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, महिला कामही करू शकतील.