काय चाललंय बुवा! लस घ्यायला निघालेच होते, तितक्यात आला लसीकरण झाल्याचा मेसेज
![What's going on, Grandpa? He was about to get vaccinated when he got the message that he had been vaccinated](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/vaccination2.jpg)
नवी दिल्ली |
देशात करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून (१ एप्रिल) सुरूवात झाली. ४५ वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यात आल्यानं नागरिकही लस घेण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. करोना प्रतिबंधात्मक लस घेण्याच्या बाबतीत शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत जागरूकता वाढीस लागलेली असताना नांदेडमध्ये वेगळाच प्रकार समोर आला आहे. उमरी तालुक्यातील (जि. नांदेड) भुजंगराव शिंदे यांना लस घेण्यापूर्वीच लसीकरण झाल्याचा मेसेज आला. शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना याची माहिती दिली.
भुजंगराव शिंदे (वय ५२) हे सावरगाव दक्षिण येथील रहिवासी असून कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेण्यासाठी ते १ एप्रिल रोजी त्यांचा मुलगा माधवराव यांच्यासोबत उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी जाण्याच्या तयारीत होते. निघत असतानाच माधवराव यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्यात त्यांचे लसीकरण झाल्याचं नमूद करून त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेण्याची सूचना करण्यात आली होती.हा प्रकार लक्षात आल्यानंतर माधवराव शिंदे यांनी आपले ईमेल बघितला. त्यात त्यांना लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्रही पाठवण्यात आलं होतं. ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर ते उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात गेले. घडलेला प्रकार त्यांनी संबंधितांना सांगितला. पण तेथे आपल्याला कोणीही दाद दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
आतापर्यंत ६०,२९,६४९ जणांचे लसीकरण
राज्यात आतापर्यंत ६०,२९,६४९ जणांचे लसीकरण झाले आहे. राज्यात ९,९१,८१२ करोनायोद्ध्यांना लसमात्रा देण्यात आली. त्यातील ४,७४,७२३ जणांना लशीची दुसरी मात्राही देण्यात आली. ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लशीची दुसरी मात्रा देण्यासही सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या वयोगटातील एकूण २७,८२,५०४ जणांना लस देण्यात आली आहे.
वाचा- “नोटाबंदी, टाळेबंदी, इंधन दरवाढ या उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका कधी सुधारणार?”