‘यास’ तौक्तेपेक्षाही भयंकर, महाराष्ट्राला काय धोका?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Kolkata-Cyclone.jpg)
मुंबई – तौक्ते चक्रीवादळापेक्षाही भयंकर असे ‘यास’ चक्रीवादळ पश्चिम बंगाल, ओडिसा, बिहार, छत्तीसगड, झारखंड या राज्यांना तडाखा देणार असे हवामान विभागाने म्हटले आहे. तर महाराष्ट्राला याचा कोणताही धोका नाही, मात्र वादळाचा परिणाम म्हणून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
यास चक्रीवादळ हे ओमानमधून आले आहे. या वादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी 50 किलोमीटर इतका आहे. या वादळाचे केंद्र पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून सुमारे 750 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव 48 तास राहील. वादळ भीषण रूप धारण करून हाहाकार उडवून देणार आहे. याचा प्रभाव विशेषत: उत्तर-पश्चिम दिशेने ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये दिसून येईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 25 मे रोजी उशिरा रात्री किंवा 26 मे रोजी सकाळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन्ही राज्यांनी वादळाच्या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी तयारी केली आहे.
दरम्यान, वेगवेगळ्या चक्रीवादळाला वेगवेगळे देश नाव देत असतात. नुकतेच धडकून गेलेल्या तौक्ते चक्रीवादळाला म्यानमारने नाव दिले होते. तसेच यास चक्रीवादळाला ओमानने नाव दिले आहे. वादळांना नाव देण्याची एक निर्धारीत प्रक्रिया आहे. त्याच प्रक्रियेला अनुसरून या वादळाचे नावही निर्धारीत प्रक्रियेनंतर ठेवले गेले आहे. ‘यास’ हा पर्शियन भाषेतील शब्द असून त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ ‘जॅस्मिन’ असा होतो.