#waragainstcorona: ..तर पुन्हा एकदा लॉकडाऊन तीव्र करावा लागेल: हसन मुश्रीफ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/5-3.jpg)
कोल्हापूर ।महाईन्यूज । प्रतिनिधी
सामाजिक अंतर, मास्क याचा वापर करावा. रस्त्यावर गर्दी केल्यास मोठा धोका निर्माण होवू शकतो. त्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये. आज रस्त्यांवरील गर्दी पाहता पुन्हा एकदा शासनाला लॉकडाऊन तीव्र करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
कोरोनाला हद्दपार झाल्याच्या अविर्भावात लोकांनी रस्त्यावर गर्दी केली आहे, अशी खंत व्यक्त करून ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, रस्त्यावरील गर्दी हाच खरा धोका आहे.जोपर्यंत कोरोनावर लस निघणार नाही, तोपर्यंत दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सामाजिक अंतर ठेवलं पाहीजे, सतत तोंडावर मास्क ठेवला पाहीजे, हात वरचेवर धुणे, हे आवश्यक आहे. गेल्या दोन-दीड महिन्यात जे यश मिळविले आहे ते रस्त्यावर गर्दी करून घालवू असं वाटू लागलं आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी शांततेनं, संयमानं घरी राहून कोरोनावर मात करावी. अनावश्यक गर्दी करू नये. आपली स्वत:ची काळजी करावी, त्याचबरोबर इतरांचीही काळजी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.