वानखेडे स्टेडियम: पन्नास वर्षांची एक साठवण
![Wankhede, Stadium, 50, Year, Storage,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/vankhede-780x470.jpg)
क्रिकेट हा भारतीयांसाठी खेळ नसून ती एक भावना आहे. एक धर्म आहे. या देशात क्रिकेटची आवड नसलेल्या व्यक्ती शोधणे अवघड. क्रिकेट कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या रूपात प्रत्येकाच्या आयुष्यात आला आहे. हेच पाहा ना, जिथे दोन भाऊ संपत्तीवरून भांडतात, तिथे भारत-पाकिस्तानचा सामना असला की ते एकाच सोफ्यावर बसून सामना पाहतात. भारत जिंकल्यावर ते भांडण विसरून एकमेकांच्या गळ्यात पडतात.
क्रिकेटचा हा जादूई खेळ आणि वानखेडे स्टेडियम यांचं नातं म्हणजे भारतीय क्रिकेटच्या आत्म्याचं प्रतिक आहे.
वानखेडेची ओळख
इंग्लंडला लॉर्ड्स मैदानाला “क्रिकेटची पंढरी” म्हटलं जातं. तसंच, भारतात वानखेडे स्टेडियमचं स्थान आहे. इथं खेळणं हे प्रत्येक उदयोन्मुख खेळाडूचं स्वप्न असतं. वानखेडेवर खेळलेला सामना खासच असतो. कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद, तिथला माहोल आणि क्रिकेटचा थरार, सगळं काही भव्यदिव्य.
वानखेडे आणि माझं नातं
माझ्या आयुष्यात वानखेडेचं स्थान खूप खास आहे. एक साधा रणजी सामना पाहण्यासाठी बाबा मला वानखेडेवर घेऊन गेले होते. त्या दिवशी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी फलंदाजी करत होते. टीव्हीवर क्रिकेट पाहणारा मी, प्रत्यक्ष मैदानावर ते दृश्य पाहून भारावून गेलो. डोळे पाणावले, का कळलंच नाही. वय लहान होतं, पण ती भावना मोठी होती.
प्रेक्षकांचा प्रतिसाद:
जेव्हा सचिन फलंदाजीला यायचा, तेव्हा पूर्ण स्टेडियम एकत्र होऊन “सचिन…सचिन…” अशा घोषणांनी दणाणून जायचं. त्याचा प्रत्येक शॉट म्हणजे सणासारखा साजरा व्हायचा. ही जादू फक्त आंतरराष्ट्रीय सामन्यांपुरती मर्यादित नव्हती. रणजी, दुलीप ट्रॉफीच्या सामन्यांमध्येही तोच उत्साह असायचा.
शशी काका आणि वानखेडे:
माझ्या काकांनी म्हणजेच माझ्या आत्याच्या यजमानांनी म्हणजेच प्रदीप आरोलकर अर्थात आमच्या शशी काकांनी स्कोअर बोर्डवर काम केलं. त्यांच्यामुळे आम्हाला वानखेडेवर अनेक सामने पाहण्याचं भाग्य मिळालं. बाबा तर शशीकाकांच्या सोबत स्कोअर बोर्डवर बसून कपिल देवची धारदार गोलंदाजी प्रत्यक्ष पाहायचे.
भव्य विजय आणि आठवणी
वानखेडेच्या आठवणी ज्या काही खास आहेत, त्यात २०११ विश्वचषक विजयानंतरचा जल्लोष विसरणं अशक्य आहे. धोनीने मारलेली ती निर्णायक षटकार, सचिनला खांद्यावर घेऊन केलेला फेरफटका, आणि संपूर्ण स्टेडियमचा तो कर्णकर्कश आनंद, सगळं अजूनही डोळ्यांसमोर जसं आहे तसंच आहे.
हेही वाचा : PCMC | रील, गाणे, रॅपमधून करा मालमत्ताकर भरण्याचे आवाहन
दुसरी आठवण म्हणजे सचिनची निवृत्ती. शेवटच्या सामन्यात त्याने केलेला खेळपट्टीला नमस्कार, त्या क्षणी अख्खं वानखेडे गहिवरून गेलं होतं. सचिनच्या त्या नमस्कारानेच वानखेडेचं महत्त्व अधोरेखित झालं.
मराठी माणसाचा अभिमान
वानखेडे स्टेडियम हे मराठी माणसाच्या जिद्दीचं मूर्तिमंत उदाहरण आहे. जेव्हा मुंबईत मराठी लोकांना दुय्यम वागणूक दिली जात होती, तेव्हा शेषराव वानखेडे यांनी हा भव्यदिव्य प्रकल्प हाती घेतला. २५ वर्षीय शशी प्रभूंनी याचं आर्किटेक्चर तयार केलं. मराठी माणसाच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून आज वानखेडे स्टेडियम भारतीय क्रिकेटची पंढरी बनलं आहे.
संपूर्ण होणारा इतिहास
पन्नास वर्षांची कहाणी संपलेली नाही. अजूनही अनेक खेळाडू इथं चमकतील, अनेक आठवणी तयार होतील. वानखेडेचा प्रवास असाच भारतीय क्रिकेटला समृद्ध करत राहील.
वानखेडेच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त सर्व क्रिकेट रसिकांना शुभेच्छा!
लेखक: हर्षल विनोद आल्पे