अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स दिल्लीत पोहोचले, आजपासून ४ दिवस भारत दौऱ्यावर

J.D. Vance India visit : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स पहिल्यांदाच भारत दौऱ्याावर आले आहेत. ते आज (दि.२१) त्यांच्या पहिल्या अधिकृत भारत दौऱ्यासाठी दिल्लीत दाखल झाले. व्हान्स यांचे दिल्लीत आगमन होताच त्यांना भारताकडून औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आजपासून २१ ते २४ एप्रिल दरम्यान चार दिवसांच्या भारत दौऱ्याला सुरुवात करतील. त्यांच्यासोबत त्यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी उषा व्हान्स, मुले इवान, विवेक आणि मिराबेल तसेच पेंटागॉन व परराष्ट्र विभागातील पाच वरिष्ठ अधिकारी दौऱ्यावर आहेत. हा व्हान्स यांचा पहिलाच भारत दौरा आहे. या दौऱ्याचे उद्दिष्ट भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, द्विपक्षीय व्यापार करारांना अंतिम स्वरूप देणे आणि दोन्ही देशांमधील सामरिक सहकार्य वृद्धिंगत करणे हे आहे.
हेही वाचा – राहुल गांधींचा ब्राउन विद्यापीठात हल्लाबोल ; महाराष्ट्र निवडणुकीवरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
जेडी व्हान्स आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यांचे विमान भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता नवी दिल्लीतील पालम येथील हवाई दलाच्या स्टेशनवर उतरले. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज सायंकाळी ६:३० वाजता पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी, ७, लोक कल्याण मार्ग येथे औपचारिक बैठक होणार आहे, अशी माहिती आहे.