मशाल, तुतारीचं पुढं काय? …खाली डोकं वर पाय !
![Torch, trumpet, forward, down, head, legs,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/tutari-780x470.jpg)
विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात अडचणीत आलेले दोन पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिल्लक सेना आणि शरद पवार यांची शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेस..म्हणजेच मशाल आणि तुतारी ! भारतीय जनता पार्टी प्रणित ‘महायुती’ चा झंजावात एवढा होता, की त्यात ‘महाआघाडी’ चा पालापाचोळा झाला, त्यातही सर्वात मोठा फटका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाला बसलाय. ‘आघाडी’ तील काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्याचे अस्तित्व इतर राज्यांमध्ये नक्कीच राहील. मशाल आणि तुतारी पुढे मात्र अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
हे दोन्ही पक्ष आणि त्यांचे नेते गेल्या काही वर्षात सत्तेसाठी हपापलेले आहेत, हे जनतेने अनेकदा अनुभवले आहे. त्यात आता प्रचंड अपयश पदरी पडल्यामुळे पाच वर्षे विरोधी बाकांवर बसण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही. तथापि, या पक्षांच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची विरोधात बसण्याची मानसिकता नसावी. त्यामुळे कधी एकदा भारतीय जनता पार्टी किंवा ‘महायुती’ तील अन्य दोन पक्षांमध्ये प्रवेश करतो, असे कार्यकर्त्यांना झाले असावे. आपले कार्यकर्ते, नेते आमदार कसे पकडून ठेवायचे, ही खरी आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची कसोटी आहे ! राजकीय विश्लेषकांच्या मते मात्र आता, मशाल अन् तुतारीची अवस्था ‘खाली डोकं वर पाय’ अशी झालेली आहे.
राजकीय परिस्थितीच बदलली !
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांनी एक स्पष्ट संदेश दिला आहे, तो म्हणजे राज्यावर ‘महायुती’ने विना अडथळा राज्य करावे, बडबड करणाऱ्या विरोधकांनी आता गप्प बसावे ! ‘महायुती’ चे कर्तृत्व आणि विरोधकांची बाष्कळ बडबड, टीका- टिप्पणी आम्हाला मान्य नाही, असाच कौल महाराष्ट्राच्या मतदारांनी दिल्याचे स्पष्ट दिसते आहे. विरोधी पक्षांचा आवाज नगण्य करून मतदारांनी तो बंदच केला आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता होऊ नये, असा हा स्पष्ट कौल आहे. विरोधकांनी पराभवाची कारणमीमांसा करून ईव्हीएम, लाडकी बहीण योजनेवर भरभरून आगपाखड केली. सुरुवातीला या मुद्द्यांवर प्रचंड कांगावा केला, धरणे धरले, आंदोलने केली.. पण आता, तो कांगावा संपवून पराभवाचे कटू सत्य स्वीकारण्याची वेळ विरोधकांवर आली आहे. यातच काँग्रेसअंतर्गत एकमेकांवर पराभवाचे खापर फोडणे सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे सेना, शरद पवार राष्ट्रवादी गटातही काँग्रेससोबतचा पुढचा प्रवास पराभवाच्या खाईत आणि आपल्या उरल्या सुरल्या पक्षासाठी धोक्याच्या वाटचालीचा वाटू लागला आहे. तिकडे काँग्रेसचे नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसमध्येही अस्वस्थता वाढली असून, अनेकजण भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, प्रसंगी अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा करू लागले आहेत. थोडक्यात काय, सत्तेच्या वळचणीला वळायचा विचार करू लागलेत, यालाच म्हणायचं, गुलाल तिकडं चांगभलं!
उबाठा, शरद पवार गटाचे पुढे काय?
राज्यातील विरोधी पक्षांना आणि त्यातही खास करून उद्धव ठाकरे तसेच शरद पवार गटाला भवितव्याच्या संकटाने ग्रासले आहे. यापुढे नेमकी कशी राजकीय वाटचाल करावी, हा प्रश्न या अभूतपूर्व निकालाने त्यांना नक्कीच पडला असेल. खरे तर काँग्रेस समोरही हा प्रश्न नक्कीच आहे. परंतु राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बराच विचार करावा लागणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे उरले, सुरलेले पक्ष किंवा गट हे प्रादेशिक पक्षच आहेत. त्यामुळे या पक्षांचे पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रातच आहेत. या पक्षांची इतर राज्यात फारशी ताकद नाही किंवा अजिबात नाही, असे म्हटले तरी हरकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा या पक्षांच्या वाटचालीवर परिणाम होणे स्वाभाविक आहे, हा मुद्दा आता महत्त्वाचा आहे.
या राजकीय पार्श्वभूमीवर पुढची पाच वर्षे नेमकी कोणती भूमिका घ्यायची, यावरून या दोन्ही पक्षांमध्ये पडद्याआड विचार मंथन सुरू असल्याचे चित्र आहे. यामध्ये विशेषतः शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संदर्भातील चर्चा मात्र चांगल्याच रंगल्या आहेत. दस्तुरखुद्द जयंत पाटील हेच अजितदादा गट अथवा भाजपामध्ये लवकरच प्रवेश करतील अशा प्रकारच्या चर्चानाही ऊत आला आहे. स्वतः, अजितदादांनीही खुली ऑफर असल्याचा आणि ते प्रतिसाद देत नसल्याचा गौप्यस्फोट नागपूच्या अधिवेशनात केला होता. दुसरीकडे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या चार-पाच भेटीतूनही वेगळ्या वाटचालीची चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे एकूणच विरोधकांच्या अस्वस्थ अवस्थेत भरच पडत चालली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक महत्त्वाची बैठक या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे सगळे आजी-माजी आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. यपुढची राजकीय वाटचाल कशी असावी, यासंदर्भात वैचारिक मंथन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, अशा प्रकारची गुप्त माहितीया दोन्ही गटाचे नेते देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक गट अजित पवारांसोबत जाण्यास उत्सुक आहे किंवा शरद पवारांनी आपला गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत विसर्जित करून एकत्र राष्ट्रवादी पुन्हा ताकदीने उभी करावी, असे त्या गटाचे म्हणणे आहे. सतेशिवाय पाच वर्ष राजकारण करणे शक्य नाही. पाच वर्षानंतर पुन्हा निवडणुकीला सामोरे जाताना लोकांसमोर काम घेऊन जावे, कोणते मुद्दे मांडावेत, हा प्रश्न आहे. त्यापेक्षा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करून एकच एकसंघ आणि ताकदवर राष्ट्रवादी पक्ष उभा करावा, असा आग्रह काही आमदारांचा असल्याचे बोलले जात आहे. अर्थात सगळ्याच आमदारांचे असे मत आहे असे नाही. काहींनी विरोधी पक्षात बसूनच आपण आपला पक्ष मजबूत करावा, असा विचार मांडला आहे. या सगळ्यांच्या मतांवर, विचारांवर सखोल चिंतन करण्यासाठीच शरद पवार यांच्या गटाने महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. कदाचित, विरोधी पक्षात राहून राजकारण करण्यापेक्षा सत्तेसोबत सामील होऊन मतदारसंघाच्या विकासाचे राजकारण करणे अधिक श्रेयस्कर आहे, हा मतप्रवाह शरद पवारांच्या गटामध्ये जोरात असला तरी किमान तीन ते चार आमदार अजित पवारांसोबत जाण्यास विरोध करीत असल्याची चर्चा आहे. त्या आमदारांची समजूत काढली जाते की त्या आमदारांची भूमिका योग्य मानून पुढील पाच वर्षे विरोधी बाकावर बसूनच पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला जातो, हे या बैठकीनंतर स्पष्ट होऊ शकते. तथापि, पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या संदर्भात निर्णय घ्यावाच लागेल, हे सांगणे महत्त्वाचे आहे, ते आता कळू शकणार नाही.
मुंबई महापालिका निवडणूक.. लिटमस टेस्ट !
आता बिगुल वाजेल ते स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ! ही तर सर्वच पक्षांच्या अस्तित्त्वाच्या दृष्टीने लिटमस टेस्ट आहे. केंद्र, राज्यातील सत्तेच्या उबीमुळे ‘महायुती’ चा तिथेही बोलबाला झाला आणि महाविकास आघाडीला तिथेही अपयश आले, तर पुढे पाच वर्षानंतर राजकीय परिस्थिती काय असेल, हे सांगता येत नाही.
त्यामुळे पाच वर्षे संघर्ष करूनही शेवटी झोळी रिकामीच राहिली तर सध्या हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्यात शहाणपण नाही, असा व्यावहारिक विचार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते करीत आहेत. खरे तर, ही समस्या उद्धव ठाकरेंच्या गटा समोरही आहे. एक दोन लोकांचा अपवाद सोडला तर शरद पवार यांच्या गटातील आमदार अजित पवारांचे नेतृत्व सहज मान्य करू शकतात आणि स्वतः शरद पवारदेखील आपले वय आणि प्रकृती लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या पुढील वाटचालीची सूत्रं अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हाती सोपवू शकतात. परंतु उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तसे काही होणे तितके सहज शक्य नाही.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आपल्या सहकाऱ्यांच्या भवितव्याचा विचार करता अतिशय महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. निर्णय चुकला की आपला पक्ष संपला, हे मोठे राजकीय समीकरण डोळ्यासमोर ठेवावे लागणार आहे. पण, सध्या या दोन नेत्यांचे पक्ष म्हणजे गट अस्तित्वात तरी आहे का ? हा तमाम महाराष्ट्र पुढील प्रश्न आहे, त्याची चर्चा सुरू आहे !