संपूर्ण घर जळून खाक झाले अन् सर्वच संपले, दिव्यांग निराधार मदतीचा पैसाही गेला जळून
![संपूर्ण घर जळून खाक झाले अन् सर्वच संपले, दिव्यांग निराधार मदतीचा पैसाही गेला जळून](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/संपूर्ण-घर-जळून-खाक-झाले-अन्-सर्वच-संपले-दिव्यांग-निराधार.jpg)
अकोला : जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळसूर येथे अचानक एकूण दोन घरे आणि तीन जनावरांच्या गोठयाला भीषण आग लागली. ही दुर्घटना आज मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. घरातील अन्न-धान्यासह सर्व जळून खाक झाले आहे. या आगीत जळून खाक झालेल्या घरांमध्ये एका दिव्यांग व्यक्तीच्या घराचाही समावेश असून त्याचे संपूर्ण साहित्य आणि मिळालेले मदतीचे पैसेही जळून गेले आहेत. या दुर्घटनेत जवळपास लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (The fire at Malsun in Akola destroyed two houses and three cowsheds)
पातूर तालुक्यातील मळसूर येथे आज सकाळी अनेक घरांना आग लागली आहे. या आगीत बघता बघता दोन घरे आणि जनावरांचे तीन गोठे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. संदीप नारायण तायडे यांच्या घराला आणि उत्तम पुरुषोत्तम तायडे, सखाराम राखोंडे, रमेश तुकाराम राखोंडे यांच्या जनवारांच्या गोठयांना ही आग लागली. या आगीची माहिती गावकऱ्यांना मिळताच सर्व जण एकत्रित जमा झाले. दरम्यान, गावकऱ्यांच्या शर्तीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मंडळ अधिकारी एस. एस. ढोरे आणि तलाठी दिपक नळकांडे यांनी आगीच्या घटनास्थळाचा पंचनामा केला. ही आग लागल्याचे नेमके कारण अद्याप कळू शकले नसून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज लावला जात आहे.
- घराला आग अन् सर्वच संपलं…
संदीप नारायण तायडे हे दिव्यांग असून ते त्यांची आई, दोन भाऊ अन् पत्नीसोबत राहत होते. दरम्यान, यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत त्याचे मोठे नुकसान झाले. दिव्यांग असलेल्या संदीपला शासनाकडून मिळत असलेले पैसे, तसेच त्याने मोलमजुरी करून जमा केलेले पैसे सुद्धा जळून खाक झाले आहेत. या आगीत १ लाखाची रोकड जळाली. शिवाय घरही पूर्णपणे जळून खाक झाल्याने आता संदीपकडे काहीही उरले नाही.