कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही; केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी
![Number of corona patients in 14 districts in the state at zero!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Coronavirus-Covid-19-2.jpg)
नवी दिल्ली – देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. मात्र धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात पुढील दोन महिने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल गुरुवारी म्हटले, ‘भारतात अजूनही कोरोना विषाणूची दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचा प्रसार कायम आहे.’
दरम्यान, ज्या राज्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, तिथेही कोरोना प्रसाराबाबत इशारा दिला गेला आहे. पुढील दोन महिने सणासुदीचा काळ आहे. अशात केंद्र सरकारने कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे आणि काही नवे नियम जारी केले आहेत. आरोग्य सचिवांनी म्हटले, ‘२१ सप्टेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक नवी एसओपी जारी केली गेली आहे. आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या जाणाऱ्या क्षेत्रांत जिथे कोरोना संक्रमणाचा दर ५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तिथे सार्वजनिक कार्यक्रम टाळावे लागतील. ज्या क्षेत्रांमध्ये हा दर ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, तिथे कार्यक्रमाआधी परवानगी घेणे गरजेचे असेल.’ तसेच आरोग्य सचिवांनी सांगितले की, ‘पुढील दोन महिने आठवडाभरात रुग्णसंख्येतील वाढ आणि घट यावर त्या क्षेत्रातील निर्बंध आणि सूट याबाबतचे नियम ठरवले जातील.