लाल किल्ला पर्यटकांसाठी 15 ऑगस्टपर्यंत बंद राहणार
नवी दिल्ली – लाखो पर्यटकांचे आकर्षण असणारा लाल किल्ला पर्यटकांसाठी 15 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. या संदर्भातील एक आदेश भारतीय पुरातत्व विभागाने जारी केला असून सुरक्षेच्या दृष्ट्रीकोनातून लाल किल्ला बंद राहणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचार आणि कोरोनामुळे लाल किल्ला जवळपास 5 महिने बंद होता. गेल्या महिन्यात 16 जूनला किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. आता पुन्हा किल्ला बंद करण्यात आला असून 16 ऑगस्ट रोजी पर्यटकांसाठी पुन्हा खुला होईल. हा आदेश भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक स्मारक डॉ. एनके पाठक यांनी जारी केला असून लाल किल्ला हा दिल्लीतील एक प्रसिद्ध मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव लाल संगमरवरी दगडावरून पडलेले असून हा किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधला गेला. दिल्लीच्या ऐतिहासिक, जुन्या दिल्ली भागात लाल किला किंवा लाल किल्ला लाल वाळूचा खडकांनी बनलेला आहे. हा किल्ला पाचव्या मुघल बादशहा शाहजहांने बांधला होता. या ऐतिहासिक किल्ल्याची 2007 साली युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून निवड केली होती.