ओमायक्रॉन चाचणी अहवाल अवघ्या दोन तासांत मिळणार
![The Omicron test report will be available in just two hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/corona-Test.jpg)
गुवाहाटी| टीम ऑनलाइन
आता आसाममधील दिब्रुगड येथील भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी एका किटची निर्मिती केली आहे. या किटमुळे ओमायक्रॉन चाचणी अहवाल दोन तासांमध्ये मिळणार आहे. ‘ओमायक्रॉन’चाचणी किट लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दिब्रुगड ‘आयसीएमआर’च्या टीमने २४ नोव्हेंबरपासून किट निर्मितीवर संशाेधन सुरु केले हाेते.ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विश्वज्योति बोरकाकोटी यांच्या नेतृत्वाखाली दिब्रुगड आयसीएमआर आणि प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्राने संयुक्तपणे किटची निर्मिती केली आहे. त्यांनी सुमारे एक हजार रुग्णांची चाचणी केली. यामध्ये अन्य राज्यांतील रुग्णांचाही समावेश होता.
यासंदर्भात माहिती देताना डॉ. विश्वज्योति बोरकाकोटी म्हणाले की, दिब्रुगड ‘आयसीएमआर आणि प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्राने संयुक्तपणे किटची निर्मिती केली आहे. आम्ही एका किटची निर्मिती केली आहे. या किटची आरटी-पीसीआर रचना ही हायड्रोलिसिस पद्धतीवर आधारीत आहे. या चाचणीचा अहवाल दोन तासांमध्ये उपलब्ध होणार आहे. कोलकाता येथील जीसीसी बायोटेक कंपनी ‘पीपीपी’च्या माध्यमातून या किटची निर्मिती करत आहे.