काॅंग्रेसचा अधिवेशन फार्स म्हणजे, बोलाची कढी, बोलाचाच भात !

गुजरातमधील अहमदाबाद येथे तब्बल ८४ वर्षांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. साहजिकच लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने ९९ जागा जिंकल्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे आणि त्यांच्या नेतेमंडळींमध्ये नक्कीच जोश आला आहे, हे त्यावेळी दिसून आले.
गुजरातमध्ये काँग्रेस सतत अपयशी !
त्या आधीच्या म्हणजे २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत लोकसभेत काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेता निवडता येईल, एवढे सुद्धा संख्याबळ नव्हते. दहा वर्षांनंतर ते ९९ करण्यातपर्यंत काँग्रेसची मजल गेली. खरोखरच ही चमकदार कामगिरी म्हणावी लागेल. आता गुजरातमध्ये काँग्रेसला मुसंडी मारायची आहे. खरे तर हे काम अवघड नव्हे, अशक्यच आहे. गुजरातमध्ये गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसला विजय मिळवता आला नाही. काँग्रेसने अनेक प्रयत्न केले, मात्र राज्यात भाजपा चा पराभव करणे, त्यांना जमलेले नाही.
हे तर नरेंद्र मोदींचे ‘होम पीच’..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरात हे ‘होम पीच’ असल्यामुळे या ठिकाणीच धमाका करावा, असा विचार काँग्रेसचा असू शकतो.या सर्व पार्श्वभूमीवर २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रबळ विरोधक म्हणून सभागृहात भूमिका बजावायची असेल, तर कष्ट घेणे आवश्यक आहे आणि काँग्रेसने त्यासाठी मिशन २०२७ अंतर्गत त्याची तयारी सुरू केली आहे. परंतु मोदी आणि अमित शाह यांच्या या राज्यात त्यांना कितपत यश मिळणार ही एक शंकाच आहे.
भाजपाने पटेल यांना हायजॅक केले !
यापूर्वी १९६१ मध्ये गुजरातच्या भावनगर येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती वर्ष असल्याने काँग्रेसने हा मुहूर्त सुद्धा विचारात घेतला आहे. विशेषतः, काँग्रेस आणि संघाचे त्यांच्याबरोबर असलेले संबंध , त्याचबरोबर नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांच्यामधील असणारे रागलोभ, यावर प्रकाश टाकून काँग्रेसच्या दृष्टीने योग्य असणारी वस्तुस्थिती त्यांना देशभर रुजवायची आहे. गेल्या ११ वर्षात भारतीय जनता पक्षाने पोलादीपुरुष वल्लभभाई पटेल यांना काँग्रेसपासून बऱ्यापैकी दूर केले आहे.. ‘हायजॅक’ केले आहे. त्यांच्या पुतळ्यापासून ते वल्लभभाई पटेल आणि संघाशी असणारे त्यांचे नाते, त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर त्यांचा असलेला कथित दुरावा याचा लेखाजोखा गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाने केवळ मांडला नाही, तर तो ताकदीने अधोरेखित केला आहे.
खर्गे यांनी पहिल्याच दिवशी तोंड फोडले !
त्यामुळेच, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षाचे अध्यक्ष म्हणून या विषयाला तोंड फोडावे लागले. एका अर्थाने नेहरू-पटेल यांच्या विचारधारा आणि त्यांच्या विचारांवर पहिला हक्क काँग्रेसचाच आहे. खरे म्हणजे, ते काँग्रेसचे संचित आहे. हे त्यांना कळवळून सांगावे लागले. यातच भारतीय जनता पक्षाने या दोघांबाबत किती परिणामकारक प्रचार केला आहे, हे लक्षात येते.
साहजिकच अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धोरणे आणि त्या धोरणांची अंमलबजावणी करणारा भारतीय जनता पक्ष हे राष्ट्राचे कल्याण करत नाहीत, जातीय तणाव निर्माण करत आहेत. विशेषतः मुस्लिम आणि अल्पसंख्यांक तसेच संविधान यावर हल्ला चढवत आहेत. संविधान बदलण्याचा किंवा ते बाजूला ठेवून मनमानी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे राहुल गांधी यांनी मोठ्या त्वेषाने सांगितले. त्याचा परिणाम किती होणार हे काळच ठरवेल!
काँग्रेसची त्रिसुत्री : विचार, आचार, प्रचार
अध्यक्षीय भाषणात राहुल गांधी यांच्या या विचारांवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी सहा महत्त्वाचे मुद्दे मांडले. यामध्ये विचार ,आचार आणि प्रचार हे मूलभूत मुद्दे काँग्रेसजनांनी विचारात घ्यायला पाहिजेत, त्यावर काम केले पाहिजे असे स्पष्ट केले. काँग्रेसकडे विचार आहेत. त्यांची भूमिका आणि दृष्टिकोन पक्का आहे. त्याप्रमाणे काम करणे, आचरण करणे गरजेचे आहे आणि जे केले आहे, यापूर्वी झाले आहे,त्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. हे त्यांनी पोटतिडकीने सांगितले. हे सांगत असतानाच या मूलभूत विचारांना पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ मानसिक बळ आणि आर्थिक बळ गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता या सगळ्या भाषणामध्ये काँग्रेसकडे जी विचारधारा आहे, त्या विचारधारेला अनुसरून काम करणारी किती मंडळी आहेत आणि जी मंडळी काम करत आहेत, त्यांना काँग्रेस खरोखर सन्मानाची वागणूक देते का? हा कळीचा मुद्दा आहे.
सगळीकडे सत्तातूर जंतू..
गेल्या दहा ते पंधरा वर्षात सत्तातूर जंतू सर्वच पक्षात वेगाने वाढल्यामुळे कोणताच पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षात आयाराम – गयारामांचे प्रमाण पाहिले, तर स्वातंत्र्य स्थापनेपासून २०१४ पर्यंत एवढ्या मंडळींनी महाराष्ट्रात पक्षांतर केले, त्यापेक्षा या दहा वर्षात अधिक कार्यकर्ते आणि नेत्यांनी आपले पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात उड्या घेतल्याचे पाहायला मिळते. थोडक्यात, सत्तेशिवाय राहता येत नाही, ही धारणा राजकारण करणाऱ्यांची झाली आहे.
राहुल गांधी हे विश्वासार्ह नेतृत्व नाही !
आता उपदेश आणि मौलिक विचारांचे बोल फारसे कोणाला पटतील, असे वाटत नाही. आई, मुलगा आणि मुलगी असे कुटुंब जेव्हा संसदेत विराजमान होते आणि जावयाला सुद्धा संसदेत येण्याची स्वप्ने पडू लागतात, अशावेळी सर्वसामान्य प्रामाणिक तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्याला उपदेशाचे डोस पाजले, तर ते किती पचतील, याचा विचार नक्कीच केला पाहिजे. काँग्रेसकडे राहुल गांधी हे विश्वासार्ह नेतृत्व नाही. लहरीनुसार ते राजकारण करतात आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेता म्हणून जी जरब सत्ताधाऱ्यांवर असली पाहिजे, ती त्यांच्याकडून निर्माण झालेली नाही. अशा परिस्थितीत काँग्रेस अधिवेशन हा एक उपचार होऊ शकतो.
अधिवेशनाची नेमकी कमाई काय ?
या सर्व पार्श्वभूमीवर भारतातील कार्यकर्त्यांना या अधिवेशनात काय मिळाले, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. अनेक महत्त्वाचे प्रश्न समोर असताना भाजप आणि संघाला दोषारोप देण्यात वेळ वाया घालवणे काँग्रेसला परवडणारे नाही. भाजपच्या दृष्टीने विरोधक म्हणून काँग्रेस हा पहिला आवडीचा पक्ष आहे. देशात काँग्रेस व्यतिरिक्त राष्ट्रीय पक्ष म्हणून विरोधक असणारा दुसरा पक्ष अस्तित्वात नाही.
हेही वाचा – नवीन प्रणालीला पुन्हा मुदतवाढ; ऑनलाइन भाडेकरार, दस्तनोंदणीत सुधारणा सुरू
विरोधक म्हणून काँग्रेसला सांभाळतील !
साहजिकच, भारतीय जनता पक्ष काँग्रेसला विरोधक म्हणून नक्कीच सांभाळेल. काँग्रेसच्या अशा अधिवेशनाने देशातील जनता फार उत्साहित होऊन काँग्रेसच्या सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू किंवा महात्मा गांधी यांच्या विचारधारेमागे तातडीने चालू लागेल, अशी आजची परिस्थिती नक्कीच नाही. किंबहुना, सांगणारे त्या तोलामोलाचे नाहीत आणि ऐकणाऱ्यांनी आपली बुद्धी गहाण टाकलेली नाही, अशी सध्याची अवस्था आहे.
गुजरात आणि बिहारच्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि त्या चांगल्या पद्धतीने लढवण्यासाठी काँग्रेसला बरेच प्रयत्न करावे लागतील, हे त्यांच्या निवडणूक पार्श्वभूमीवरच्या या पहिल्या अधिवेशनातून स्पष्ट झाले, आणि ते सर्वांच्या लक्षात आलेले आहे !
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा