उन्हाचा कडाखा वाढल्याने सुगंध देणाऱ्या फुलांची आवक कमी
ऐन लग्नाच्या सीझनमध्ये फुलांच्या किमती वाढल्यामुळे ग्राहक त्रस्त

सोलापूर : उन्हाचा कडाखा वाढला असल्याने सुगंध देणाऱ्या फुलांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे शहर बाजारात फुलांचे दर वाढलेले आहेत. सध्या सणांचा काळ सुरु असून लग्नसराईही आहे. परंतु फुलांची आवक याकाळात कमीच असल्याने अस्सल फुलांच्याजागी काहीप्रमाणात प्लास्टिकच्या फुले अन् पुदिन्याच्या हारांनी ही कसर भरून काढली आहे.
ऐन लग्नाच्या सीझनमध्ये फुलांच्या किमती वाढल्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. उन्हाच्या कडाक्यामुळे फुलबागांना हवे तितके पाणी मिळत नाही. फुलांची आवक कमी झाली आहे आणि लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात फुलांची मागणी वाढते, ज्यामुळे दरात वाढ होते. गुलाब आणि इतर फुलांच्या दरातही वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी १०० ते १५० रुपये किलो असलेला गुलाब आता २०० रुपये किलोने विकला जात आहे.
हेही वाचा – महापालिका उभारणार पाच काेटींची ‘क्लायम्बिंग वॉल’
फुलाचे नाव व दर (किलोत)
पिवळा झेंडू : ४०
लाल : ५०
गुलछडी (निशिगंध) : १५०
शेवंती : २५०
मोगरा : २५०
ताजा गुलाब : ५०
बटन किंवा चिनी गुलाब : १००
एका नगाची किंमत (रुपयांत)
जरबेरा : १० ते १५
जर्मन रोझ : १०
अबोली गजरा : २०
प्लास्टिक फुलेही हुबेहुब…
अनेकठिकाणी अस्सल फुलांची जागा प्लास्टिक फुलांनी घेतली आहे. अनेकवेळा फुलांच्या हारातही काही प्रमाणात प्लास्टिक फुलांचा वापर केला जातो. तर दिवाळी दसऱ्याच्या काळात तर प्लास्टिक फुलांच्या माळा, तोरणांची चौकाचौकात विक्री होताना आपल्याला दिसतेच.
पुदिन्याचा नवा ट्रेंड…
मागील अनेक वर्षांपासून फुलांच्या हारांची जागा पुदिन्याच्या हाराने घेतली आहे. फुलाच्या पाकळ्या गळत असल्याने त्याजागी पुदिन्याचे आकर्षक व मोठ्या आकारातील हार शहरात बनवले जात आहेत. यात पाच फुलांपासून क्रेनला लावले जाणाऱ्या हारांचा समावेश असतो.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
कच्चा माल महागल्याचा परिणाम तयार मालावर नक्कीच होत आहे. भेट म्हणून देण्यात येणारे बुके व सत्कार किंवा पूजेत वापरात येणाऱ्या हारांच्या किंमतीही त्यामुळे वाढल्या आहेत. साधा बुके १०० रुपयांपासून तर गोल हार ५० रुपयांना एक नग मिळत आहे. मोगऱ्याचा गजराही आता १० रुपयांना एक झाला आहे.
– देविदास फुलारी, विक्रेते व कलावंत