बेगडी चेहऱ्यामागची बेजबाबदारपणाची कोल्हे कुई !
![Stupid, faceless, irresponsible, fox, kui,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/kolhe-780x470.jpg)
छोट्या पडद्यावर दिसणारा नकली शिवाजी किंवा नकली संभाजी हा आपल्या आयुष्यात देखील खोटारडा आणि नकलीपणाचा बुरखा पांघरून वावरतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. देशप्रेमाचा आव आणायचा, स्क्रिप्ट रायटर ने लिहून दिलेले डायलॉग हाणायचे आणि वास्तवात मात्र ढोंगी राजकारण करायचे हा आता शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सर्व परिचित असा गुण झाला आहे. बेगडी चेहऱ्यामागील बोगस देशप्रेम, समाजाच्या उद्धारासाठी केलेल्या पोकळ घोषणा आणि परिस्थितीप्रमाणे कोलांटउड्या मारण्याचा अलौकिक दुर्गुण डॉक्टर साहेबांच्या नसानसात भिनला आहे, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही, ते सिद्ध झालेलेच आहे.
सर्वधर्मसमभावाचा ढोंगी नारा पिटत आमचा हा खासदार नेहमीच कोल्हेकुई करतो, छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभुराजे यांच्या नावाचा पुरेपूर वापर करून समाजात वावरतो, निवडून येतो आणि धर्मनिरपेक्षतेच्या लंब्याचौड्या बाता मारतो. प्रत्यक्षात, मात्र त्याचा हा नकली बुरखा वारंवार चव्हाट्यावर येतो आणि हा कोणाचाच नाही, हे सर्व समाजाच्या लक्षात येते.
त्याचं झालं काय, ज्या शिरूर मतदार संघानं या बोगस लोकप्रतिनिधीला निवडून दिलं, त्या मतदार संघातील सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं त्यानं नेहमीच टाळलं आहे.. मग तो एखादा उत्सव असो, एखादं आंदोलन असो किंवा एखाद्या समाजाची अस्मिता सांभाळणारा भव्य दिव्य कार्यक्रम असो. आमच्या या नतद्रष्ट डॉक्टरांची अशा मोठ्या कार्यक्रमाला नेहमीच दांडी ही ठरलेली !
भीमा-कोरेगाव शौर्य दिनाकडे पाठ
संपूर्ण समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असलेला भीमा कोरेगाव येथे प्रचंड गर्दीत साजरा होणारा शौर्य दिनाचा कार्यक्रम. खास या कार्यक्रमासाठी म्हणून दूर दूर चे बांधव येतात, हजेरी लावून जातात. येथील कार्यक्रमावरूनच काही वर्षांपूर्वी दंगल उसळली होती, हा इतिहास ताजा आहे. पण, दोन्ही डगरींवर हात ठेवून स्वार्थाची पोळी भाजणारा येथील खासदार निवडून आल्यानंतर जो गायब झाला आहे, त्याचा शोध मात्र घ्यायला हवा. पुण्यामध्ये उपस्थित असतानाही त्यांनी या शौर्य दिनाकडे दुर्लक्ष केले याबद्दल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मात्र संतापले आहेत.आपल्या देशाविषयी प्रत्येक भाषणामध्ये बेगडी प्रेम दाखवणारा डॉक्टर साहेबांचा चेहरा संपूर्ण मतदारसंघाला आता परिचयाचा झाला आहे. मतदार संघात माळी आणि मराठा असा अघोषित संघर्ष पेटवून द्यायचा, मतदारांना भुरळ पाडायची आणि निवडून यायचे, हा या खासदाराचा नित्याचाच कार्यक्रम झाला आहे.
काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे उंबरठे झिजवणारा हा खासदार ऐनवेळी हळूच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात शिरला. त्या पक्षाच्या नेत्यांवर भुरळ पाडून मुख्य प्रवक्ता बनला, आणि मालिकांमध्ये केवळ शिवरायांची आणि शंभूराजांची भूमिका केली असल्यामुळे त्या भांडवलावर गर्दी खेचू लागला. मतदारांनी सुद्धा त्याला डोक्यावर घेतले आणि दोन वेळा निवडून दिले. पण, त्याच्या बेगडी प्रेमाचे वास्तव आता उघड्यावर पडले असून शौर्य दिनाच्या निमित्ताने त्याची अनुपस्थिती मात्र चांगलीच गाजली. अशा महत्त्वाच्या वेळी हा बोगस नेता नेहमीच गैरहजर असतो, हे जनतेच्या लक्षात आलं, आणि मग चर्चेला उधाण आलं.
आळंदीच्या संजीवन सोहळ्यालाही अनुपस्थित
या नकली शिवाजीनं कोण कोणत्या प्रमुख कार्यक्रमाला दांडी मारली, याचा पाढाच मतदारसंघातील नागरिक वाचू लागले आहेत. आळंदी येथे पार पडलेल्या संजीवन सोहळ्याची डॉक्टर साहेबांची अनुपस्थिती हा देखील असाच चर्चेचा विषय होता. समाज कोणता हा भाग गौण आहे. पण, अशा कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला पाहिजे, ही सर्वसामान्यांची भावना असते आणि त्यालाच हे बेजबाबदार खासदार नेहमी हरताळ फासतात.
डॉक्टर साहेबांच्या दांड्यांचा विषय झाला किंवा चर्चा झाली की दुसरा मुद्दा येतो, तो जेजुरीमध्ये चंपाषष्ठी सोहळ्याला त्यांनी मारलेल्या दांडीचा. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमालाही अनुपस्थित राहून डॉक्टर साहेबांनी आपला खरा चेहरा जेजुरीकरांना आणि मतदारसंघाला दाखवला आहे.
शिवराज्याभिषेकची अनुपस्थिती खटकली
मतदार संघातील अनेकांच्या डोळ्यावर आली, ती डॉक्टर साहेबांनी शिवनेरीच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला दाखवलेली अनुपस्थिती ! दूरदर्शनवरील मालिकांमध्ये डॉक्टर साहेबांनी साकारलेली शिवरायांची भूमिका संपूर्ण राज्यात आणि देशात गाजली होती. जनतासुद्धा त्यांच्याकडे प्रति शिवाजी म्हणून बघत होती. त्यानंतर त्यांची शंभुराजांची भूमिका देखील चांगलीच गाजली. त्यांच्या या भूमिका म्हणजे शिवराय आणि शंभुराजे यांच्या कर्तृत्वाचा आणि अठरा पगड जाती सांभाळणाऱ्या नेतृत्वाचा अपमान म्हणावा की काय ? अशी वागणूक डॉक्टर साहेबांनी वेळोवेळी दाखवली आहे. मुख्यतः, छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या शिवनेरी गडावर झाला, तेथे साजऱ्या झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला डॉक्टर साहेबांनी मारलेली दांडी विशेष चर्चिली गेली.
वास्तविक, त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करायला हवा होता. पण, त्यांना काळजी आहे ती फक्त आपल्या खासदारकीची ! निवडून आले की पुन्हा पाच वर्षे मतदार संघाची काळजी करायची नाही आणि या भागात फिरकायचे नाही असा पायंडा या दांडी बहाद्दर खासदाराने पाडला आहे.
देशप्रेमाचा पुळका, प्रत्यक्षात उलटेच !
सतत कोल्हेकुई करणारा हा खासदार महत्त्वाच्या वेळी गैरहजर असतो, हे प्रत्येकाच्याच लक्षात आलं आहे. एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर नसला, तरी त्यावर प्रतिक्रिया देण्याचा त्रास सुद्धा तो कधी घेत नाही. आपण किती देशप्रेमी आहोत, हे पटवून देण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी होऊ दे, पण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांवर कारवाई सुरू असताना तोंडातून चकार शब्द न काढणारा हा खासदार प्रत्येकासाठी निषेधाचा विषय झाला आहे. गेल्या वर्षभरात या परिसरात तब्बल 29 बांगलादेशी नागरिक आणि चार रोहिंग्यावर कारवाई झाली. पण डॉक्टर महाशय मात्र आपल्या वागणुकीमुळे त्यांच्या पक्षाला खड्ड्यात घालण्यात मश्गूल होते. त्यांनी चौकशी करण्याची तसदी सुद्धा घेतली नाही किंवा पुढील काय पावले असावीत याचे मार्गदर्शन देखील नागरिकांना,कार्यकर्त्यांना किंवा पोलिसांना केले नाही. बांगला देशातील हिंदूंवर होणारे अन्याय ते पाहत असतील पण इथे पकडलेल्या बांगलादेशीबाबत ठोस निर्णय घेण्यात त्यांनी कधीच पुढाकार घेतला नाही.
कुदळवाडीत खासदार फिरकले का?
कुदळवाडी, चिखली येथील गोदामनालागलेल्या आगी नंतर विधानसभेत आमदारांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक राहत असल्याचा दावा करण्यात आला होता आणि याच चिखली परिसरातून बांगलादेशी नागरिक किंवा रोहिंग्याना अटक केल्याच्या नोंदी आहेत. पण आमचे खासदार महाशय त्या दिशेने फिरकलेले सुद्धा नाहीत. यावर त्यांचे उत्तर ठरलेले असेल, की मी खासदार आहे. माझा संबंध लोकसभेत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, देशद्रोही अशा 370 व्या कलमाचा प्रश्न असो, वक्फ विधेयकाचा प्रश्न असो, आमचे हे खासदार त्यावरील चर्चेच्या वेळी आपले मत न मांडता सभात्याग करतात, आणि महत्त्वाच्या वेळी संसदेत देखील गैरहजर असतात, हे देखील सर्वांनी पाहिले आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. असा ‘डबल ढोलकी’ खासदार शिरूर मतदार संघाला लाभावा, हे तेथील नागरिकांचे दुर्दैवच आहे. पण, आता पुढील निवडणुकीत या बेजबाबदार खासदाराला चपराक दिल्याशिवाय नागरिक गप्प बसणार नाहीत, हे वेगळे सांगायला नको !