सांगली महापालिकेचा फटाकेमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी उत्सव
![Sangli Municipal Corporation's firecracker free environment friendly Diwali celebration](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/sangli.jpg)
- प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांकडून ‘ई-शपथ’
सांगली |
वायुप्रदूषण रोखण्यासाठी यंदाच्या दिवाळीत सांगली महापालिका फटाकेमुक्त दिवाळी उत्सव साजरा करणार आहे. यासाठी प्रत्येक शाळेत जाऊन फटाकेमुक्त दिवाळीची ‘ई-शपथ’ शालेय विद्यार्थ्यांकडून घेतली जाणार आहे. यासाठी महापालिकेने ४० अधिकाऱ्यांचे एक पथक नियुक्त केले आहे. वाढते प्रदूषण रोखून शहर अधिकाधिक पर्यावरणपूरक राखण्यासाठी माझी वसुंधरा अभियान महापालिकेने हाती घेतले आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्यासह सर्व सहायक आयुक्त आणि खातेप्रमुख उपस्थित होते.
यावेळी आयुक्त म्हणाले, शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीसाठी आणि दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण रोखण्यासाठी सांगली महापालिकेकडून यंदाचा फटाकेमुक्त दिवाळी उत्सव महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये राबविला जाणार आहे. या अभियानामध्ये महापालिकेकडून नेमण्यात आलेले ४० नोडल अधिकारी हे शाळांमध्ये जाऊन माझी वसुंधरा अभियानाची माहिती सर्वांना देणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांमध्ये फटाकेमुक्त दिवाळीबाबत जागृती करणार आहेत. विद्यार्थ्यांकडून पालकांना याबाबत प्रदूषण मुक्तीबाबत माहिती देण्याचा प्रयत्न राहणार आहे. वाढते प्रदूषण रोखणे ही सर्वांचीच जबाबदारी असून यासाठी लोकप्रतिनिधींचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.