केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद; चार राज्यांनी ‘ब्लॅक फंगस’ला महामारी घोषित केले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/118428511_gettyimages-1215124320-170667a-1.jpg)
नवी दिल्ली – देशात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘ब्लॅक फंगस’ला एपिडेमिक डिसिजेस ऍक्ट, 1897 अन्वये महामारी जाहीर करावे असे आवाहन सर्व राज्यांना केले होते. केंद्राच्या या आवाहनाला प्रतिसाद देत तामिळनाडू, ओडिशा, गुजरात आणि चंदीगडने ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. तर तेलंगणा आणि राजस्थान या दोन राज्यांनी हा निर्णय पूर्वीच घेतला आहे.
केंद्रीय मंत्रालयाने सर्व राज्यांना एक पत्र लिहून म्हटले होते, कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये, विशेषतः ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांना ब्लॅक फंगसचा धोका वाढत आहे. ब्लॅक फंगसच्या रुग्णांसंबंधी सर्व माहिती रुग्णालयांनी आणि त्या त्या राज्यांनी देणे बंधणकारक असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, देशात आतापर्यंत ब्लॅक फंगसची 7,521 प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी 219 रुग्णांना आपला जीव गमावला आहे. महत्त्वाचे म्हणजे या आजारावर लवकर उपचार केले नाही तर श्वसन, मेंदू आणि डोळ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. त्यामुळे या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे.