पहिल्याच दिवशी 25 लाख नागरिकांची नोंदणी, 1.28 नागरिकांचं लसीकरण
नवी दिल्ली – देशभरात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अशा बड्या नेत्यांसहीत देशातील सामान्य नागरिकांनीही कोरोना लसीकरणात सहभाग घेतला. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी जवळपास १.२८ लाख नागरिकांनी कोरोना लसीचा डोस घेतला. तर एकाच दिवसात तब्बल २५ लाख नागरिकांनी लसीकरणासाठी पोर्टलवर नाव नोंदणी केलीय.
आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी ६० वर्षांहून अधिक वयाच्या एकूण १ लाख २८ हजार ६३० लोकांना लसीचा पहिला डोस दिला गेला. सोबतच ४५ वर्षांहून अधिक परंतु गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या १८ हजार ८५० जणांनी कोरोना लस घेतली. भारतात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आत्तापर्यंत एकूण १.४७ कोटी नागरिकांना कोरोना लस देण्यात आलीय.
दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी नाव नोंदणी करणाऱ्या २५ लाखांपैंकी २४.५ लाख सामान्य नागरिक आहेत तर उरलेले आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धे आहेत. भारतात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झालीय.