राफेल कंपनीच्या मालकाचे हेलिकॉप्टर अपघातात निधन
![Raphael company owner dies in helicopter crash](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Capture56788.jpg)
पॅरिस – राफेल लढाऊ विमाने तयार करणाऱ्या कंपनीचे मालक ओलिवियर दसॉ यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. दसॉ हे सुट्ट्यांनिमित्त गेले असता रविवारी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या खासगी हेलिकॉप्टरला नॉर्मंडी परिसराजवळ अपघात झाला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दसॉ यांना श्रद्धांजली अर्पण करत फ्रान्सची सतत सेवा करणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली आहे.
फ्रान्समधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे ६९ वर्षीय ओलिवियर दसॉ हे फ्रान्समधील उद्योगपती आणि अब्जाधीश सर्ज दसॉ यांचे पुत्र होते. ओलिवियर यांची कंपनीच जगप्रसिद्ध राफेल लढाऊ विमाने तयार करते. तसेच ओलिवियर हे फ्रान्सच्या संसदेचेही सदस्य होते. संसदेचे सदस्य असल्याने राजकारण आणि उद्योगांमध्ये एकमेकांचा प्रभाव पडू नये म्हणून त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळावरून पदाचा राजीनामा दिला होता. २०२० या वर्षात फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दसॉ यांना त्यांच्या भावंडासोबत ३६१वे स्थान मिळाले होते.
दरम्यान, दसॉ यांच्यासह या हेलिकॉप्टरमधील चालकाचाही मृत्यू झाल्याचे कळते आहे. तसेच या दोघांव्यतिरिक्त हेलिकॉप्टरमध्ये इतर कोणीही नसल्याची माहिती समोर येत आहे.