राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा केरळ दौऱ्यादरम्यान अपघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौर्यादरम्यान एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. पत्तनामथिट्टा जिल्ह्यातील प्रमादम स्टेडियमवर हेलिकॉप्टर लँडिंग करत असताना हेलिपॅडचा काही भाग अचानक खचला. यामुळे वायूसेनेचे हेलिकॉप्टर अडकल्याने क्षणिक गोंधळ उडाला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
२१ ऑक्टोबरपासून राष्ट्रपती मुर्मू केरळच्या चार दिवसीय दौर्यावर आहेत. आज त्यांचा सबरीमला येथील भगवान अयप्पा मंदिरात दर्शनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी पत्तनामथिट्टा जिल्ह्यातील प्रमादम स्टेडियमवरून त्यांच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले. याचवेळी हेलिपॅडवरील जमीन अचानक खाली खचली आणि हेलिकॉप्टर अडकले.
हेही वाचा – लाडकी बहिण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय, ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या वजनामुळेच हेलिपॅडचा काही भाग कोसळला. हेलिकॉप्टर अडकताच घटनास्थळी तैनात पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने पुढे सरसावले. त्यांनी हेलिकॉप्टरला खचलेल्या भागातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये सुरक्षारक्षक आणि कर्मचारी हेलिकॉप्टरला ढकलत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.




