पंतप्रधानांचे ट्विटर अकाऊंट हॅक! बिटकॉईनबाबत केले होते ट्विट
![Opposition blocks development in Uttar Pradesh: PM Narendra Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/modi-monsoon-session-photos.jpg)
नवी दिल्ली – लॉकडाऊन काळात एकीकडे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या तर दुसरीकडे गुन्हेगारी वृत्तीला उधाण आले. या काळात सायबर गुन्ह्यांच्या बातम्यादेखील एका दिवसाआड एक ऐकू येत आहेत. त्यात आता तर थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या @narendramodi या अकाऊंटवरून रविवारी, १२ डिसेंबर रोजी रात्री जवळपास २ वाजून ११ मिनिटांनी एक ट्विट समोर आले. त्यात म्हटले होते की, ‘भारताने बिटकॉईनला कायदेशीररीत्या मान्यता दिली आहे. भारताने ५०० बिटकॉईन खरेदी केले असून ते देशातील सर्व नागरिकांमध्ये वाटण्यात येत आहेत.’ त्यानंतर दुसऱ्या मिनिटाला हे ट्विट डिलिट करण्यात आले, मात्र २ वाजून १४ मिनिटांनी आणखी एक ट्विट समोर आले. त्यात पहिल्या ट्विटसारखीच माहिती देण्यात आली होती. मात्र तेदेखील काही वेळातच डिलिट करण्यात आले, परंतु तोपर्यंत त्याचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते.
याबाबत पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते, अशी माहिती दिली. तसेच ‘ट्विटरला याबाबत कळविले असून अकाऊंट तात्काळ पुन्हा सुरक्षित करण्यात आले आहे. अकाऊंटसोबत छेडछाड झालेल्या काळात करण्यात आलेल्या ट्वीटकडे तुम्ही दुर्लक्ष करा’, असे आवाहन पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ‘जर देशाच्या पंतप्रधानांचे अकाऊंट हॅक होत असेल, तर देशातील नागरिकांची सुरक्षा अतिशय नाजूक स्थितीत आहे’, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारने आतापर्यंत क्रिप्टोकरन्सीला कोणतीही मान्यता दिलेली नाही. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही क्रिप्टोकरन्सीबाबत चिंता व्यक्त केली आहे.