तिरुपती बालाजी मंदिरात प्लास्टिक बंदी; प्रसाद पर्यावरणपूरक बॅगेतून मिळणार
![Plastic ban at Tirupati Balaji Temple; Prasad will be available in an eco-friendly bag](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/jpgsegergre.jpg)
तिरुपती – भारतातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात आता प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता भक्तांना दिला जाणारा प्रसादाचा लाडू बायोडिग्रेडेबल म्हणजेच नष्ट करता येणाऱ्या पर्यावरणपूरक बॅगेतून देण्यात येणार आहे. डिफेंस रिसर्च ऍंड डेवलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओचे अध्यक्ष सतिश रेड्डी, तिरुमला देवस्थान समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ. के. एस. रेड्डी आणि अतिरिक्त कार्यकारी अधिकारी ए. वी. धर्म रेड्डी यांनी काल रविवारी अशा पर्यावरणपूरक बॅगेतून दिल्या जाणाऱ्या एका विशेष प्रसाद लाडूविक्री काउंटरचे उद्घाटन केले आहे.
यावेळी सतीश रेड्डी म्हणाले की, हैद्राबादमध्ये डीआरडीओच्या अत्याधुनिक बायोडिग्रेडेबल बॅग बनवण्यासाठी अनेक संशोधन आणि प्रयोग केले आहेत. पर्यावरणाशी सुसंगत अशा गोष्टी बनवण्यासाठी डिआरडीओचे संशोधन अद्यापही सुरू आहे. एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णत: कमी करत आम्ही कॉर्न स्टार्चपासून पर्यावरणपूरक बॅग उपलब्ध केल्या आहेत. ही बॅग ९० दिवसांनंतर आपोआप नष्ट होते. तसेच पर्यावरणात मिसळून जाते. जनावरांनी ही बॅग खाल्ली तरी त्यांना काहीही धोका पोहचत नाही, तर पेट्रोकेमिकल्सपासून बनवण्यात आलेल्या पॉलिथिन बॅगा पर्यावरणासाठी घातक असतात. त्यांना नष्ट व्हायला २०० वर्ष लागतात. त्यामुळे त्याला अशा बायोडिग्रेडेबल म्हणजेच पर्यावरणपूरक बॅगा हा पर्याय आहे. याची मानव जातीच्या अस्तित्वासाठी गरज आहे. काही दिवस भक्तांची प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर याची विक्री पूर्ण क्षमतेने सुरू केली जाणार असल्याचे डॉ. के. एस. रेड्डी यांनी यावेळी सांगितले.