पिंपरी-चिंचवड महापालिका वर्धापन दिन : युवा नेते पार्थ पवारांना स्मरण… अन् महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांना विस्मरण !
![Pimpri-Chinchwad Municipal Corporation Anniversary: Remembrance of Young Leader Partha Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/pcmc-anniversary.jpg)
- १५-२० वर्षे महापालिकेत सत्ता भोगलेल्या नेत्यांचे दुर्लक्ष
- महापालिकेत सत्ता हवी, पणवर्धापन दिनी साध्या शुभेच्छा नाही
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ते २० वर्षे सत्ता भोगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांना महापालिका वर्धापन दिनाचे विस्मरण झाले. मात्र, युवा नेते पार्थ पवार यांनी पिंपरी-चिंचवडकरांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाविकास आघाडी अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून नव्हे, तर स्थानिक नेत्यांच्याही वर्धापन दिन स्मरणात राहिला नाही, अशी खंत पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका ११ ऑक्टोबर २०२१ रोजी ३९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने यानिमित्ताने शहरात विविध उपक्रमांचे आयोजन केले. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकर असल्याचा अभिमान वाटतो…असा शहरवासीयांना भावनिक संदेश दिला. फेसबूक लाईव्ह करीत नागरिकांशी संवाद साधला. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले आणि काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सोशल मीडियावर एक ओळीचाही शुभेच्छा संदेश दिला नाही.
फेसबुक लाईव्ह | मला घडविण्यात माझ्या शहराचे भरीव योगदान आहे, यावर लवकरच संवाद साधण्यास येतोय…
पिंपरी चिंचवड शहराच्या 39 व्या वर्धापनदिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा! पिंपरी चिंचवड माझी शान माझा अभिमान #PimpriChinchwadFirsthttps://t.co/lR46lCJP6h
— Mahesh Landge (@maheshklandge) October 11, 2021
केंद्रातील भाजपा सरकारविरोधात सोमवारी (११ऑक्टोबर) महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. व्यापारी, दुकानदार, नागरिकांना आवाहन करीत बंदमध्ये सहभागी होण्याचा आग्रह करण्यात आला. त्याला ठिकठिकाणी यशही मिळाले. पण, बंद यशस्वी करण्याच्या भानगडीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या शहर कुटुंबप्रमुखांना महापालिका वर्धापन दिनाचा विसर पडला.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जंटलमन’ युवा नेते पार्थ पवार यांनी मात्र पिंपरी-चिंचवडकरांना न विसरता शुभेच्छा दिल्या आहेत.
कामगारनगरी, उद्योगनगरी ते राहण्यायोग्य शहरांच्या यादीत अव्वल स्थान निर्माण करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराच्या महानगरपालिकेचा आज ३९ वा वर्धापनदिन. केवळ नगरपालिका ते महानगरपालिकाच नाही तर स्मार्ट सिटी या प्रवासात अनेकांचे योगदान राहिले असून, सर्वांना या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. #PCMC
— Parth Pawar (@parthajitpawar) October 11, 2021
सेना, राष्ट्रवादीच्या खासदारांनाही विसर…
राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असतात. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेत दौरा करुन स्थानिक समस्यांबाबत पुढाकार घेतात. पण, पिंपरी-चिंचवड महापालिका वर्धापन दिनी शहरवासीयांना शुभेच्छा द्यायला विसरले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही जमले नाही. दुसरीकडे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करतात. मात्र, बारणे यांनाही पिंपरी-चिंचवडकरांना शुभेच्छा देण्याचे सूचले नाही.
माजी आमदार विलास लांडेंची अशीही चूक…
भोसरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विलास लांडे यांनी वर्धापन दिनी शुभेच्छा दिल्या. १० वर्षे आमदार, घरात महापौर, स्थायी समिती सभापतीसह विविध पदे मिळवलेल्या आणि आतापर्यंत १२ वेळा नगरसेवकपद कुटुंब-नातेवाईंकांकडे असलेल्या विलास लांडे यांना महापालिकेचा वर्धापन दिन कितवा आहे? हे स्मरणात राहिले नाही. ३९ वा वर्धापन दिन असताना लांडे यांनी थेट ३२ वा वर्धापन दिन करुन शहरवासीयांना संभ्रमात टाकले. सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट चूक लक्षात आल्यानंतर काढून टाकण्यात आली. दुसरीकडे, लांडे यांचे मित्रवर्य आणि पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांनाही शुभेच्छा देण्याचा विसर पडला. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने विविध उपक्रम आयोजित केले. मात्र, सत्ताधारी पक्षाचे नेते आणि चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनीही वर्धापन दिनानिमितत्त पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना शुभेच्छा देणे अपेक्षीत होते. पण, तसे झाले नाही. गेल्या काही दिवसांमध्ये ट्टिवटरवर कमालीचे सक्रिय असलेल्या जगताप यांना वर्धापन दिनाचा विसर पडला.