पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले; १५ पैसे लिटरने दर कपात
![Fuel price hike for the seventh day in a row in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/petrol-.jpg)
नवी दिल्ली – भारतीय तेल कंपन्यांनी आज इंधनाच्या दरात कपात केली. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी १० ते १५ पैसे लिटरने स्वस्त झाले आहे. यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मुंबईत पेट्रोल १३ पैशांनी स्वस्त झाल्याने ते १०७ रुपये २६ पैसे लिटर झाले आहे, तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाल्याने ते ९६ रुपये १९ पैसे लिटर झाले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यानंतरही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र आज तेल कंपन्यांनी इंधन दरात कपात केली. त्यात पेट्रोल आणि डिझेल १५ पैसे लिटरने स्वस्त झाले आहे. यामुळे आज दिल्लीत पेट्रोल १०१ रुपये १९ पैसे आणि डिझेल ८८ रुपये ६५ पैसे लिटर होते. कोलकत्यात पेट्रोल १०१ रुपये ६२ पैसे आणि डिझेल ९१ रुपये ७२ पैसे, चेन्नईत पेट्रोल ९८ रुपये ९६ पैसे आणि डिझेल ९३ रुपये २० पैसे, बंगळुरूत पेट्रोल १०४ रुपये ७० पैसे आणि डिझेल ९४ रुपये ४ पैसे लिटर होते.