आता रुग्णांची माहिती होणार डिजिटल; २७ सप्टेंबरपासून प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य अभियानाला प्रारंभ
![Patient information will now be digital; PM launches digital health campaign from September 27](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/images-5-2.jpeg)
नवी दिल्ली – प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य अभियान योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबरपासून सुरू करणार असून ही योजना नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन या नावाने सुरू होती. प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य अभियान माहिती आणि पायाभूत सुविधांच्या विस्तृत श्रेणीद्वारे कार्यक्षम, प्रवेशयोग्य, सर्वसमावेशक, परवडणारे आणि सुरक्षित पद्धतीने सार्वत्रिक आरोग्य संरक्षण प्रदान करणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.
प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य मिशन योजना आता देशभरात विस्तारित होणार आहे. लोकांची डिजिटल आरोग्य ओळखपत्रे बनवली जातील. २७ सप्टेंबरला नरेंद्र मोदी या योजनेची देशव्यापी घोषणा करणार असल्याचे मनसुख मांडविया यांनी सांगितले. या हेल्थ ओळखपत्रामध्ये व्यक्तीचा संपूर्ण वैद्यकीय माहिती असणार आहे.
लोकांना अनेकदा त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी किंवा उपचारासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागते. कधीकधी सर्व आरोग्य अहवाल घेऊन जाणे शक्य नसते किंवा कधी काही अहवाल गहाळ होण्याची शक्यता असते. आता या डिजिटल आरोग्य ओळखपत्रात संबंधित व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्याचा तपशील असणार. त्याला कोणता आजार होता, उपचार कोठे केले गेले आणि कोणत्या डॉक्टरांनी केले. उपचार, औषधे वगैरे सगळ्याचा परिणाम काय झाला. ही सर्व माहिती ओळखपाद्वारे मिळणार आहे. यासह रुग्णाच्या आजाराबाबत समजून घेण्यासाठी दुसर्या डॉक्टरला सुरुवातीपासूनच जाणून घेण्याची गरज भासणार नाही.