स्वातंत्र्यदिनी ७५ कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभागी व्हा; UGC चं विद्यापीठांना पत्र
![स्वातंत्र्यदिनी ७५ कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभागी व्हा; UGC चं विद्यापीठांना पत्र](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/ugc-letter.jpeg)
नवी दिल्ली |
७५ व्या स्वातंत्र्यदिनी ७५ कोटी लोक सूर्यनमस्कार घालणार आहेत. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पत्र लिहून ७५ व्या स्वातंत्र्यदिनी सूर्यनमस्कार घालण्यास सांगितले आहे.UGC सचिव रजनीश जैन यांनी देशातील १०००हून अधिक विद्यापीठांच्या कुलगुरूंना आणि ४० हजारहून अधिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहून जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये होणार्या ७५ कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगितले आहे.
रजनीश जैन यांनी लिहिलेल्या पत्रात असेही म्हटले आहे की या कार्यक्रमाचे उद्दिष्ट सुमारे ३० हजार महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या ३ लाख विद्यार्थ्यांद्वारे ७५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याचे आहे. पत्रात १ जानेवारी २०२२ ते ७ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत चालणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तसेच या उपक्रमाचा प्रचार करण्यासाठी सर्व संस्थांना सांगण्यात आले आहे. तथापि, पत्रासोबत जोडलेल्या एका पानानुसार, कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ५१ दिवसांच्या कालावधीत सुमारे २१ दिवस सूर्यनमस्कार करावे लागतील. २१ दिवस दररोज १३ सूर्यनमस्कार करावे लागतील.
याशिवाय २१ दिवसांच्या या कार्यक्रमासाठी दररोज एक मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच सहभागी विद्यार्थी आणि संस्थांना ७५ कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रमासाठी तयार केलेल्या वेबसाइटवर नोंदणी करण्यास सांगितले आहे. सहभागी विद्यार्थी या उपक्रमात एकटे किंवा गटासह सहभागी होऊ शकतात, असेही यात सांगण्यात आले. मात्र, यूजीसीच्या या आदेशाला अनेक शिक्षणतज्ज्ञांनी विरोधही केला आहे. टेलीग्राफच्या अहवालानुसार, अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजेन हर्षे म्हणाले की, यूजीसीची भूमिका शैक्षणिक मानकांचे पालन करणे आणि राखणे ही आहे, विशिष्ट प्रसंगी साजरे करण्यासाठी सूचना जारी करणे नाही. यूजीसीचा हा आदेश शैक्षणिक स्वातंत्र्य आणि उच्च शिक्षणाच्या विरोधात आहे.