मुदत संपली तरी मतदार नोंदणीचा पर्याय, शिक्षक मतदारसंघ निवडणूक
![Option of voter registration even after expiry of term, Teacher Constituency Election](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/voterslist-780x470.jpg)
विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणीची मुदत संपली असली तरी आक्षेप घेण्याच्या तारखेदरम्यान नोंदणी करता येणार आहे. दरम्यान, सीबीएससी व आयसीएससी शाळेतील शिक्षकांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिक्षक मतदारसंघासाठी फेब्रुवारीत निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीसाठी ७ नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती. या तारखेपर्यंत ११,००३ शिक्षकांनी नोंदणी केली. २३ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान या यादीवर हरकती दावे सादर करता येणार आहेत. या काळात शिक्षकांना नोंदणीसाठी अर्ज करता येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले.
सीबीएससी व आयसीएससी शाळेतील पात्र शिक्षकांची नोंदणी करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली असल्याने त्यांना नोंदणी करता येईल,असे यावेळी डॉ. इटनकर यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार राहुल सारंग उपस्थित होते.
गठ्ठा नोंदणी अर्ज देण्यावर मर्यादा
लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी तपासून मतदारांना आक्षेप, दावे सादर करता येईल. राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना एकाच वेळी फक्त दहा अर्ज सादर करता येईल. त्यासोबत त्यांना ते मतदारांना ओळखत असल्याचे हमीपत्रही भरून द्यावे लागेल,असे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले.