पश्चिम विदर्भातील जलसाठय़ात केवळ सात टक्क्यांची वाढ!
![Only 7% increase in water storage in West Vidarbha!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/03/pune-dam.jpg)
अमरावती |
पश्चिम विदर्भात गेल्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली असली, तरी महिनाभरात समाधानकारक पाऊस न झाल्याने सिंचन प्रकल्प अजूनही तहानलेलेच आहेत. सद्यस्थितीत अमरावती विभागातील मोठय़ा, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये १०५८ दशलक्ष घनमीटर म्हणजे के वळ ३३ टक्के जलसाठा झाला आहे. संपूर्ण जून महिन्यात पाणीसाठय़ात केवळ सात टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्य़ांमध्ये गेल्यावर्षी जूनअखेर मोठय़ा आणि मध्यम प्रकल्पांमध्ये ३५ टक्के, तर लघु प्रकल्पांमध्ये १८ टक्के पाणीसाठा होता. यंदा २९ जूनपर्यंत मोठय़ा प्रकल्पांमध्ये ३९, मध्यम प्रकल्पांमध्ये ४० तर लघु प्रकल्पांमध्ये २३ टक्के पाणीसाठा झाला आहे. अनेक लघु प्रकल्पांमध्ये अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. अप्पर वर्धा धरणात २५६ दशलक्ष घनमीटर (४५ टक्के), बेंबळा १०३ दलघमी (५६ टक्के) तर पेनटाकळी प्रकल्पात १७ दलघमी (२९ टक्के) पाणीसाठा झाला आहे.
नळगंगा प्रकल्पामध्ये केवळ २८ टक्के पाणी साठवले गेले आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पाचा जलसाठा देखील २८ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. यंदा पाऊस लांबल्याने चिंतेचे सावट पसरले आहे. पण गेल्या दोन दिवसांमध्ये सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे तूट भरून निघण्याची अपेक्षा आहे. अमरावती विभागातील ९ मोठय़ा प्रकल्पांमध्ये २९ जून अखेर ५३५ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३८ टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या ७ जूनला हा जलसाठा ४४८ दलघमीपर्यंत होता. गेल्या महिनाभरात जलसाठा सहा टक्क्यांनी वाढला आहे. विभागातील २५ मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या २८३ दलघमी पाणीसाठा झाला आहे. गेल्या महिनाभरात पाणीसाठा ८ टक्क्यांनी वाढला आहे. ४७७ लघू प्रकल्पांमध्ये २६६ दलघमी पाणीसाठा आहे, महिनाभरात पाणीसाठा सात टक्क्यांनी वाढला आहे. अमरावती विभागातील सर्वात मोठय़ा अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र हे मध्यप्रदेशात आहे. या प्रकल्पात समाधानकारक जलसाठा न झाल्याने त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले होते. पण गेल्या काही दिवसात चांगल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठय़ात थोडी सुधारणा झाली.
गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत अप्पर वर्धात ५१ टक्के साठा झाला होता. काटेपूर्णा प्रकल्पात गेल्यावर्षी याच कालावधीत ३७ टक्के, अरुणावती प्रकल्पात १३ टक्के, बेंबळा प्रकल्पात शून्य टक्के, ईसापूर प्रकल्पात ३९ टक्के, वाण प्रकल्पात ४१ टक्के, नळगंगा प्रकल्पात ५१ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ४६ टक्के, तर खडकपूर्णा प्रकल्पात १८ टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागातील मोठय़ा प्रकल्पांपैकी अप्पर वर्धा प्रकल्पात सध्या २५६ दलघमी (४५टक्के), पूस ३३ दलघमी (३६ टक्के), अरुणावती ५४ दलघमी (३२ टक्के), बेंबळा १०३ दलघमी (५६टक्के), काटेपूर्णा २५ दलघमी (२८ टक्के), वाण २६ दलघमी (३१ टक्के), नळगंगा १९ दलघमी (२८ टक्के), पेनटाकळी १७ दलघमी (२९ टक्के), तर ईसापूर प्रकल्पात ७८४ दलघमी (४८ टक्के) पाणीसाठा आहे.