अधिवेशन काळात नातेवाईकांकडे थांबता येणार नाही; कर्मचाऱ्यांना सरकारी निवासात मुक्कामाची सक्ती
![One cannot stay with relatives during the session; Employees forced to stay in government accommodation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Nagpur-Convention-780x470.jpg)
विधिमंडळ अधिवेशनासाठी मुंबईहून नागपूरला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी निवासातच मुक्काम करावा लागेल. नातेवाईकांकडे थांबल्यास सरकारी खोलीत जागा मिळणार नाही, असे विधिमंडळ सचिवालयाने स्पष्ट केले आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी मुंबईहून येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था नागपुरातील सिव्हिल लाईन्समधील १६० खोल्यांच्या इमारतींमध्ये केली जाते. प्रत्येक खोलीमध्य पाच जणांची व्यवस्था असते. कर्मचाऱ्यांनी मुंबई सोडण्यापूर्वीच नागपुरातील खोली वाटपाचे नियोजन झालेले असते व त्यानुसार कर्मचाऱ्यांना नागपुरात पोहोचल्यावर मिळालेल्या खोलीत मुक्काम करावा लागतो.
१९ डिसेंबरपासून नागपुरात अधिवेशन सुरू होणार असून त्यासाठी खोल्या वाटपाचे नियोजन विधिमंडळ सचिवालयाने सुरू केले आहे. नागपूरला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे १८ नोव्हेंबरपर्यंत मागवण्यात आली आहेत. काही कर्मचारी नावे देऊनही नागपुरात आल्यावर मात्र नातेवाईकांकडे मुक्कामी असतात. यावर आता प्रतिबंध घालण्यात आला आहे. ज्यांनी खोल्यांसाठी नावे दिली असतील त्यांना तेथेच राहावे लागेल. इतरत्र थांबता येणार नाही. ज्यांना नातेवाईकांच्या घरी मुक्कामी राहायचे असेल त्यांनी निवासासाठी नावे देऊ नयेे. असे केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा विधिमंडळ सचिवालयाने २ नोव्हेंबरला जारी केलेल्या परिपत्रकात दिला आहे. दरम्यान, नागपूरचे अधिवेशन दोन आठवड्यांचे राहील, असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दिले आहेत. मात्र कार्यकाळ वाढवण्याची मागणी झाल्यास त्याचाही विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन वर्ष विदर्भात अधिवेशन झाले नाही, त्यामुळे अधिवेशन तीन आठवड्यांचे करावे,अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जाण्याची शक्यता आहे.