breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही; सरकारचे लेखी आश्वासन

वडीगोद्री : गेल्या १० दिवसांपासून वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ सुरू केलेले बेमुदत उपोषण लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी शनिवारी दुपारी ३.३० वाजता स्थगित केले. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे लेखी आश्वासन सरकारने दिल्याने उपोषण स्थगित करत असल्याचे हाके यांनी जाहीर केले. राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज त्यांच्या भेटीसाठी येथे आले होते. यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्री होते.

छत्रपती संभाजीनगर विमानतळावर शनिवारी दुपारी शिष्टमंडळ दाखल झाले. शिष्टमंडळाची विमानतळावरच काही वेळ बैठक झाली. त्यानंतर ते जालन्यातील उपोषणस्थळी वडगोद्रीच्या दिशेने रवाना झाले. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास शिष्टमंडळ उपोषणस्थळी दाखल झाले. या शिष्टमंडळाची लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर हाके यांनी उपोषण तूर्त स्थगित केल्याची घोषणा केली. शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी दहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडले.

‘‘ आमच्या दोन-तीन मागण्या सोडल्या तर सर्वच मागण्या पूर्ण झाल्या आहेत. ‘सगेसोयरे’चा आदेश आणखी आलेला नाही, तो सर्वपक्षीय बैठकीनंतर निघेल असे शासनाचे आश्वासन ग्राह्य धरून उपोषण स्थगित करण्यात आले आहे. इतर मागण्यांवर शासनाची श्वेतपत्रिका मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील,’’ असे हाके यांनी जाहीर केले. येत्या अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक घेण्यात येईल.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. काही मागण्यांचा निर्णय झाला आहे व काही निर्णय अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठकीत होणार आहेत. याबाबत शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली असून तसे पत्र शिष्टमंडळाकडून उपोषणकर्त्यांना देण्यात आले. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. ‘सगेसोयरे’ कायद्याची अंमलबजावणी करू नये, यासह इतर मागण्यांसाठी हे उपोषण सुरू होते.

शासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी शनिवारी वडीगोद्री येथे मंत्री छगन भुजबळ, मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार विकास महात्मे, प्रकाश शेंडगे आदींचे शिष्टमंडळ पाठविले होते. त्यांनी उपोषणस्थळी येऊन लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्यासोबत चर्चा केली. ‘सगेसोयरे’ हा शब्दच नाही, यावर सरकारची भूमिका ठाम आहे, असे पडळकर म्हणाले. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. ओबीसींच्या भावनांचा सन्मान सरकारने केला आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. तत्पूर्वी, आमदार राजेश टोपे यांनी सकाळी उपोषणस्थळी भेट दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button