दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना
![New Delhi Police Commissioner Rakesh Asthana](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Capturebhjjihihihih.jpg)
नवी दिल्ली – गृह मंत्रालयाने दिल्ली पोलीस दलात मोठा बदल केला आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरात कॅडरचे अधिकारी असलेल्या अस्थाना यांच्या निवृत्तीच्या तीन वर्षे आधी ही जबाबदारी देण्यात आली असून आता त्यांना वर्षे वाढ देण्यात आली आहे.
अतिशय हुशार आणि स्मार्ट अधिकारी अशी राकेश अस्थाना यांची ओळख आहे. दिल्लीच्या आयुक्तपदी विराजमान होण्यापूर्वी ते सीबीआयचे विशेष संचालक, तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक होते. सीबीआयमध्ये नियुक्तीवेळी तत्कालीन संचालक अलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता. दोघांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर अस्थाना यांची बदली करण्यात आली होती.
राकेश अस्थाना यांनी बिहारच्या नेतरहाट (आता झारखंडमध्ये आहे) विद्यालयात प्रथामिक शिक्षण घेतले. नंतर उच्च शिक्षणासाठी ते दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आले. त्यावेळी पहिल्याच प्रयत्नात ते केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससीची परीक्षा पास झाले. तेव्हापासून राकेश अस्थाना हे नेहमी आपल्या कामामुळे, आपल्या कृतीमुळे चर्चेत राहिले आहेत. चारा घोटाळ्यासंबंधित प्रकरणांच्या चौकशीत त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. सीबीआयचे एसपी असताना त्यांनी चारा घोटाळा प्रकरणाची चौकशी केली होती. तसेच ते नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अतिरिक्त महासंचालक असताना त्यांच्या देखरेखीखाली अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूशीसंबंधित अंमली पदार्थ प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. त्याचबरोबर आसाराम बापूला अट केल्यानंतर त्याचा मुलगा नारायण साई यालाही गुजरात सरकारने अटक करण्याचा निर्णय घेतला. याची जबाबदारी राकेश अस्थाना यांच्यावर देण्यात आली होती. तर गुजरातमधील इशरत जहां चकमक प्रकरणी राकेश अस्थाना यांनी फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्याला पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी भाग पाडले होते, असा आरोप गुजरात कॅडरमधील आयपीएस अधिकारी सतीश वर्मा यांनी गुजरात उच्च न्यायालयात केला होता.
दरम्यान, १९८४च्या बॅचचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना हे आतापर्यंत सीमा सुरक्षा दलाचे संचालक होते. त्यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर आयटीबीपीचे महासंचालक एस. एस. देवसाल यांच्याकडे सीमा सुरक्षा दलाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.