नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट, पंतप्रधान अमेरिकेला जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच अमेरिका दौऱ्यावर
![Narendra Modi, Donald, Trump, meet, PM, US,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/modi-780x470.jpg)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये जाणारे पहिले परदेशी मंत्री असणार आहेत. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. फ्रान्समध्ये येत्या 10 आणि 11 फेब्रुवारीला आर्टिफिशियल इंटेलिजन्सी अॅक्शन समिट असणार आहे. या समिटसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. यानंतर नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 27 जानेवारीला फोनवर संभाषण झालं होतं. यावेळी या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये मोदींच्या अमेरिका दौऱ्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी या भेटीचे नियोजन केले जात असल्याचं रणधीर जैस्वाल यांनी सांगितलं. तसेच नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तारखेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतलं जाणार असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं.
हेही वाचा : ‘विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रात सन्नाटा पसरला’; राज ठाकरेंकडून शंका उपस्थित
भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होणार
माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी देखील याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “डोनाल्ड ट्रम्प 2.0 सरकारच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध आणखी मजबूत होतील. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची अमेरिकेच्या संसदेतील उपस्थिती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्यक्तीगत मिळालेलं निमंत्रण या दोन गोष्टींमुळे भारत-अमेरिका संबंध एका वेगळ्या उंचावर जाण्याचे संकेत मिळत आहेत”, असं हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले आहेत.
“राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सध्याच्या घडीला स्वतंत्र आणि मजबूत जनादेश आहे. त्यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात योग्य ताळमेळ आहे. ‘हाउडी मोदी’ (ह्यूस्टन 2019) आणि ‘नमस्ते ट्रम्प’ (अहमदाबाद, 2020) सारख्या कार्यक्रमांचं आयोजन त्यांच्या मित्रत्वाचं प्रमाण आहे”, असंदेखील हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प हे आगामी काळात भारत दौऱ्यावर देखील येणार असल्याची माहिती आहे.