नांदेड महानगर विकास आराखड्यासाठी ‘मास्टर प्लॅन’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तातडीने बैठक
नांदेड : नांदेड शहर आणि परिसराचे पुढील २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने नांदेड जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि संबंधित यंत्रणांची तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. २५) दिले.
शहराच्या सुनियोजित विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमण्याबाबतदेखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना केली. सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे नांदेड शहर विकास आराखड्यासंदर्भात बैठक झाली.
त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सूचना केल्या. यावेळी खासदार अशोक चव्हाण, अजित गोपछेडे, रवींद्र चव्हाण, आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त विक्रमकुमार उपस्थित होते.
हेही वाचा – राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट दिलासा
नांदेडचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.नांदेड शहराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. पवित्रनगरी म्हणून या शहराचा सुनियोजित विकास होणे गरजेचे आहे. याठिकाणी देश आणि जगभरातून लाखो भाविक येतात. त्यामुळे चांगले रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, बगीचे शहरात व्हावे याकरिता पुढील २५ वर्षांचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून शहराचा विकास आराखडा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
‘एमएमआरडीए’ने त्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि संबंधितांची एक बैठक घेऊन शहराचा सुनियोजित विकास कसा करता येईल, याबाबत चर्चा करावी. आवश्यकता भासल्यास शहराच्या विकास आराखडा कसा असावा, पवित्रनगरी म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास करता येईल, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमावा, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा – COVID-19 : चीनमध्ये सापडले आणखी २० विषाणू; निपाह आणि हेंद्रा सारखे घातक




