नागपूर शहरात रामजन्मोत्सवानिमित्त रामनवमी शोभायात्रा उत्साहात
पोद्दारेश्वर मंदिर व रामनगर येथील शोभायात्रांमुळे नागपूरकर भारावले

नागपूर : भगवान श्रीरामाच्या वेशभूषेतील लोभस चिमुकले.. मन प्रसन्न करणारी आरास.. रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी सज्ज भक्तगण… अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिकृती अन् रामनामाचा जयघोष अशा भक्तीमय वातावरणात उपराजधानीत शोभायात्रेला रविवारी दुपारी प्रारंभ झाला. रामजन्मोत्सवानिमित्त शहरातील ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर आणि रामनगर येथील मंदिरातून निघालेल्या शोभायात्रांमधील सहभागींच्या उत्साहाने अवघी संत्रानगरी‘राममय’ झाली होती. दरम्यान धार्मिक व सामाजिक संस्थांकडून ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसह भाविकांना महाप्रसाद, शरबत व खाद्यपदार्थांचे वितरण करण्यात आले. शोभायात्रा पाहण्यासाठी जमलेल्या लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
रामनवमिनिमित्त पोद्दारेश्वर मंदिर संस्थानातर्फे ५९ व्यावर्षी मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. याशिवाय तर, पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे रामनगर येथील राममंदिरातून सायंकाळी ५.३० वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी, मंगला आरती, अभिषेक, अभ्यंगस्नान, कीर्तन, भजन, महाप्रसाद असे पूजाविधी करण्यात आले.
दरम्यान राजजन्मोत्सवानिमित्त विविध भागांतून श्रीरामाचा जयजयकार करत पालख्या काढण्यात आल्या. मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. शोभायात्रेच्या निमित्ताने विविध मार्गांवर आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. चौकाचौकात पौराणिक दृश्ये साकारण्यात आली होती. शहरभरातील राममंदिरांमध्ये सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
हेही वाचा – ‘संजय राऊतांनी सामनातून काँग्रेसचे विचार मांडायला सुरुवात केलीय’; मंत्री योगेश कदम यांचा टोला
मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांनी केले सारथ्य
पोद्दारेश्वर राममंदिरातून निघालेल्या शोभायात्रेच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या विशेष गजरथात विराजमान प्रभू रामचंद्राची मूर्ती प्रत्येक भाविकांचे लक्ष वेधत होती. पोद्दारेश्वर राम मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, आमदार विकास ठाकरे, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, नितीन राऊत, कृपाल तुमाने, माजी खासदार अजय संचेती, माजी मंत्री अनिस अहमद, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, मंदिराचे विश्वस्त महेंद्र पोद्दार यांच्यासह संस्थानाचे पदाधिकारी व मान्यवरांनी पूजाविधी केले अन् प्रभू श्रीरामाचा रथ ओढत सारथ्य केले.
विविध जाती-धर्माच्या लोकांचा सहभाग
शोभायात्रेत पौराणिक व सामाजिक विषयांवरील आधारित चित्ररथांना प्रामुख्याने स्थान मिळाल्याचे पाहायला मिळाले. पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघालेल्या शोभायात्रेत एकूण ९० चित्ररथांसोबत बहारदार लोकनृत्यांसह सहभागी झाले होते. विविध जाती-धर्माच्या लोकांचा सहभाग होता. मुस्लीम बांधवांकडून श्रीरामांच्या मूर्तीवर पुष्पवर्षाव करण्यात आला. मोमीनपुरा परिसरात मुस्लीम बांधवांकडून सरबत वितरण करण्यात आले.
आकर्षक चित्ररथांनी वेधले लक्ष
अयोध्येतील रामलल्लासह, श्री तिरूपती बालाजी, कोराडीची महालक्ष्मी जगदंबा, बांकेबिरहारी दर्शन, श्रीराम सेतू निर्माण, श्री खाटुश्याम दर्शन, श्री बैद्यनाथ ज्योर्तिलिंग, लव-कुश रामायण पाठ, श्री केदारनाथ धाम, श्री स्वामी समर्थ ब्रम्हांड नायक दर्शन, प्रयागराज महाकुंभ दर्शन, श्री विष्णू अवतार, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठ, शिव पार्वती विवाह, राजा दक्षचा वध, श्री नृसिंह अवतार आणि अनेक आकर्षक चित्ररथांचा समावेश होता. याशिवाय १५१ महिला व पुरुषांनी केलेल्या शंखनादाने आसमंत दणाणून सुटला होता. राममंदिरातून शोभायात्रा निघाल्यानंतर इतवारी, हंसापुरी, किराणा ओळ, शहीद चौक, बडकस चौक, महाल, कॉटन मार्केट, सीताबर्डी मार्गे टेकडी रोड मार्गाने पोद्यारेश्वर मंदिरात शोभायात्रा परतली.