‘येडियुरप्पांवर हल्ले चढवणाऱ्या आमदारांच्या बडतर्फीची मागणी’
![MLAs demand attack on Yeddyurappa](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/di-3-1.jpg)
कर्नाटक |
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर पक्षातीलच काही जण सतत हल्ले चढवत असल्याच्या पार्श्वभूमीवर; पक्षाचे आमदार दिल्लीत पक्ष प्रमुखांची भेट घेऊन अशा आमदारांच्या बडतर्फीची मागणी करतील, असे मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव एम. पी. रेणुकाचार्य यांनी गुरुवारी सांगितले. येडियुरप्पा यांच्या निंदकांनी राजीनामा द्यावा आणि नव्याने निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान होन्नाळीचे आमदार असलेले रेणुकाचार्य यांनी दिले. राज्यात पक्ष वाढण्याचे आणि सत्तेवर येण्याचे श्रेय लिंगायत समाजातील दिग्गज नेते असलेले येडियुरप्पा यांनाच असल्याचे ते म्हणाले.
‘येडियुरप्पा काय तयार अन्नपदार्थ आहेत का? त्यांनी पक्षाची बांधणी व जोपासना केली आहे. त्यांच्यावर टीका करणे हे भाजपवर टीका करण्यासारखे आहे,’ असे रेणुकाचार्य म्हणाले. येडियुरप्पा हे भ्रष्टाचार किंवा इतर तत्सम प्रकरणांत गुंतलेले नसल्याचे रेणुकाचार्य यांनी पत्रकारांना सांगितले. ‘येडियुरप्पा यांना अडचणीत आणणे योग्य नाही असे आम्ही वारंवार सांगत आहोत. या संबंधात आम्ही आमदार मिळून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊ,’ असेही ते म्हणाले. लोकसभेचे अधिवेशन सुरू होईल त्या वेळी आम्ही राष्ट्रीय नेत्यांना भेटू आणि अशाप्रकारची वक्तव्ये करून गोंधळ निर्माण करणाऱ्यांच्या बडतर्फीची मागणी करू, कारण यामुळे पक्षाच्या प्रतिमेला तडा जात आहे, असे रेणुकाचार्य यांनी सांगितले.