निमित्त मोर्चाचे..संधी मात्र, विरोधकांना एकत्र येण्याची !
महाराष्ट्रातील बहुतेक राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते थोडक्यात किंवा अल्पकालीन मिळणाऱ्या फायद्याच्या नादात दीर्घकालीन तोटे विसरतात आणि नंतर मतदारांकडून फटके खातात. महाराष्ट्रात राज आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी एकत्र येऊन मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला खरा, तोदेखील हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात! ही सक्ती असावी की, युक्तीने भाषा शिकवावी, हा निर्णय वास्तविक पालकांनी घ्यायचा आहे.
मोठ्या क्रांतीची अपेक्षा करायची का?
यामुद्द्या बाबत मतमतांतरे असू शकतात. पण, एक भलामोठा मोर्चा काढून फार मोठी राजकीय क्रांती होईल किंवा कसे, हे मोर्चा काढणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. मोर्चात केलेली मागणी लक्षात घेऊन कदाचित सरकार ही सक्ती वगैरे बाजूला ठेवू शकते. पण, पुढील निवडणुकीत मतदारांना ते मान्य होईल का? महाराष्ट्रात आता संयुक्त विरोधी पक्ष होण्याची होड सुरु झाली आहे की काय ? एका दृष्टीने भाजपा आणि मंडळींना दूर ठेवण्यासाठी विरोधकांना एकत्र येण्याची संधी मात्र आहे !
प्रथम नाव कोणाचे घेणार ?
महाराष्ट्रामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि अखंड शिवसेना यांची ‘युती’ होती, तेव्हा आधी कोणाचे नाव घ्यायचे हाही मुद्दा असे. अशी अनेक उदाहरणे आढळतात. संगीतकार अजय – अतुल हे सख्खे भाऊ. अजयचे नाव पहिले येत असले तरी तो धाकटा भाऊ आहे. अंगापिंडाने तो मोठा असला तरी शाब्दिक दादागिरी अतुलची ! दोघेही छान संगीत देतात. ” गुन गुन गुना रे ” एवढे एक गाणे ऐकले, तरी याची प्रचिती येईल. तशीच थोडीशी परिस्थिती ठाकरे बंधू यांची आहे. ताकद उद्धव ठाकरे यांची अधिक असली, तरी आवाज मात्र राज यांचा मोठा आहे. दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् केला तर नको कोण म्हणणार आहे ? किंबहुना, महाराष्ट्राची तीच अपेक्षा आहे !
सत्ताधाऱ्यांना विरोध, हाच मुद्दा!
दुसरा मुद्दा असा, की मोर्चाच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे बंधू यांना पाठिंबा देणे किंवा काँग्रेस पक्षाने देखील समर्थन देणे हे मनोरंजक आणि बरेचसे गंमतीशीर वाटते. सत्ताधारी आघाडी ला विरोध एवढा एकच संयुक्त मुद्दा.. पण, त्यातून एक अगतिकता दिसून आली आणि ती म्हणजे मुख्य विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रात आधी आपली मांड बसवावी आणि मग आगामी निवडणुकीत आपली ताकद दाखवावी, एवढा साधा विषय आहे.
महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती वेगळी..
पण, येथे परिस्थिती वेगळी दिसते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे १३ जागा जिंकल्यानंतर हा महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष झाला असे मानले गेले. मग, ‘महाआघाडी’ त काँग्रेसला लढविण्यासाठी सर्वाधिक जागा मिळाल्या. पण दुर्दैव असे की जेवढ्या लोकसभेत मिळाल्या, जवळपास तेवढ्याच विधानसभेत मिळाल्या.
दिल्लीतून पाठवलेला नेता अपयशी..
प्रचंड अपयश पदरी पडल्यानंतर आता तो ईव्हीएम घोटाळा वगैरे सांगत राहुल गांधी यांनी देशभर पक्षाची फरपट करुन घेतली, तशी महाराष्ट्रात काँग्रेसची सुरु झाली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नावाचे आहेत, पण पक्षाचे वर्धन काही होताना दिसत नाही. याचे कारण म्हणजे दिल्लीतून नेमले गेलेले काँग्रेसचे मुख्यमंत्री यशस्वी होत नाहीत, तर प्रदेशाध्यक्ष यशस्वी होण्याची सुतराम शक्यता नाही. ग्रामीण भागातून एखादे नेतृत्व उभे राहिले असते, तर कदाचित काँग्रेसला बरे दिवस आले असते. पण, हातामध्ये १३ खासदार असून पक्षाला राज्यात त्यांचा जवळपास काही उपयोग नाही.
राजकीय ताकद वाढवण्यासाठी..
थोडक्यात काय, कोणताही एक पक्ष महाराष्ट्रात मुख्य विरोधी पक्ष होण्याच्या परिस्थितीत नाही. एकमेकांना टेकू लावत दिवस ढकलून कोणताही राजकीय पक्ष मोठा होऊ शकत नाही. एखाद्या भाषेची सक्ती हा विषय दक्षिणेकडील राज्यांमध्ये कदाचित संवेदनशील असू शकतो. पण, महाराष्ट्रात त्या विषयावर मोर्चा काढून फार मोठा राजकीय लाभ होईल, ही कल्पना फारशी पटणारी नाही. फक्त या निमित्ताने एकमेकांच्या बरोबर फरपटत जाऊन आपली स्वतःची ताकद वाढविण्याच्या मर्यादा राजकीय पक्षांनी तयार करुन घेतल्या आहेत.
‘समविचार’ हा एकच धागा..
ठाकरे बंधूंच्या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व पक्षांचा आणि त्यांच्या नेत्यांचा एकच समविचार आहे आणि तो म्हणजे सत्तेवर असणाऱ्या ‘महायुती’ला हटवणे! त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. त्यांना ‘फेक नॅरेटिव्ह’ हवा आहे आणि तो मराठी-हिंदी वादामध्ये त्यांना मिळाला आहे. याचा अचूक फायदा उचलून ‘महायुती’ला बदनाम करण्याची संधी हे मोर्चावाले दवडणार नाहीत. एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद नक्की दिसणार आहे, त्याला आता सत्ताधारी ‘महायुती’ कशाप्रकारे हाताळते, हे आता पाहण्यासारखे आहे!




