हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांचे निधन
हिमाचल प्रदेश |
हिमाचल प्रदेशचे सहा वेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्रसिंह यांचे गुरुवारी सकाळी येथे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. वीरभद्रसिंह यांनी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पहाटे ३.४० वाजता अखेरचा श्वाास घेतला, असे ज्येष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉ. जनक राज यांनी सांगितले. वीरभद्रसिंह यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. श्वासनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना बुधवारी कृत्रिम श्वासनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. वीरभद्रसिंह नऊ वेळा आमदार म्हणून तर पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रतिभा सिंह आणि पुत्र विक्रमादित्य सिंह असा परिवार आहे. प्रतिभा सिंह या माजी खासदार आहेत तर विक्रमादित्य हे सिमला ग्रामीण मतदारसंघातील आमदार आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी वीरभद्रसिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. हिमाचल प्रदेश सरकारने गुरुवारी तीन दिवसांचा दुखवटा व्यक्त केला आहे. वीरभद्रसिंह यांना ११ जून रोजी दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली होती, त्यानंतर ३० एप्रिल रोजी त्यांना घरी पाठविण्यात आले होते. तथापि, श्वासनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते आणि तेव्हापासून ते रुग्णालयातच होते. सिमला जिल्ह्यातील बुशाहर येथील शाही कुटुंबात वीरभद्रसिंह यांचा २३ जून १९३४ रोजी जन्म झाला होता. त्यांनी राज्याचे सहा वेळा मुख्यमंत्रिपद भूषविले होते.





