मोठी दुर्घटना: राजकोटच्या गेम झोनमध्ये लागली भीषण आग; 24 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 12 मुले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/mahaenews-7-1-780x470.jpg)
Rajkot Game Zone Fire : गुजरातमधील राजकोट शहरातील कलावद रोडवर असलेल्या टीआरपी गेम झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी 5.30 वाजता भीषण आग लागली. या अपघातात 12 मुलांसह 24 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 25 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून गेम झेन जळून खाक झाला आहे.
मृतांचा आकडा वाढू शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मृतांचे मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटू शकली नाही. ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे.
आग लागली त्यावेळी गेम झोनमध्ये किती लोक उपस्थित होते, हे अद्याप प्रशासनाकडून सांगितले गेले नाही. अनेक अग्निशमन दल आणि बचाव पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. 3 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आले आहे.
हेही वाचा – ‘देशात इंडिया आघाडीला अनुकूल अंडरकरंट’; प्रियंका गांधी
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, 10 सेकंदातच आग पसरली
घटनास्थळी उपस्थित असलेले यश पटोलिया म्हणाले, ‘आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. गेम झोनमध्ये आग लागल्याचे. 10 सेकंदात आग संपूर्ण परिसरात पसरली. गेम झोनमध्ये अनेक ठिकाणी दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे कामही सुरू असल्याचे आणखी एका व्यक्तीने सांगितले. मोठ्या प्रमाणात प्लाय आणि लाकडाचे तुकडे इकडे तिकडे पसरले होते. तेही आगीच्या भक्ष्यस्थानी आले आणि आग पसरत राहिली. आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेले नाही.
दरम्यन, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, राजकोटमधील गेम झोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत महापालिका आणि प्रशासनाला तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.