ताज्या घडामोडीविदर्भ

लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम रेशीमबाग येथे आयोजित

महायुतीची ताकद वाढेल तशी बहिणींची ओवाळणीची रक्कमही वाढेल : एकनाथ शिंदे

नागपूर : लाडकी बहीण योजना लोकप्रिय होत असल्याने आधी योजनेची टिंगल टवाळकी करणारे आता दुसऱ्यांच्या नावे काम करीत आहे. या योजनेतून राज्यातील करोडो महिलांना पैसे मिळत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. यापूर्वीचे सरकार हे हप्ते घेणारे होते, आताचे सरकार हप्ते देणारे आहे. महायुतीची ताकद वाढेल, तशी बहिणींची ओवाळणीची रक्कमही वाढेल, अशी घोषणा शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम रेशीमबाग येथे शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री धर्मरावबाबा आत्राम, जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार, खात्याचे सचिव अनुपकुमार, आयुक्त प्रशांत नारनवरे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आतापर्यंत दीड कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे टाकण्यात आले आहेत. त्या सक्षम व्हाव्यात यासाठीच ही योजना सुरू केली आहे. ही आमच्याकडून ओवाळणी आणि माहेरचा आहेर समजा. मात्र, तुम्ही जर सरकारची ताकद वाढविली तर ही ओवाळणी अधिक वाढेल. दोन, अडीच, तीन हजार होईल. मात्र, त्यासाठी तुम्हाला सरकारची साथ द्यावी लागेल.

आधी योजनेवर टीका करणारे आता, योजना यशस्वी होत असल्याने ती बंद करण्याकरिता न्यायालयात याचिका टाकत आहेत. योजना बंद होऊ देणार नाही. योजनेच्या यशस्वीतेमुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ही योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे. लखपती दिदीमध्ये तीन कोटी लाभार्थ्यांमध्ये ५० लाखांपेक्षा लाभार्थी राज्यातील व्हावे हे आमचे लक्ष्य आहे. त्याचा लाभ माझ्या बहिणींना मिळणार आहे.

योजना कुणीही बंद पाडू शकत नाही : अजित पवार
विरोधकांकडून योजनेवर टीका केली जात आहे. सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना १५०० रुपयांचे मोल कळणार नाही. ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न होत असून विरोधक न्यायालयात जात आहेत. परंतु कुणी मायकालाल ही योजना बंद पाडू शकत नाही. योजना सुरू करताना आम्ही जातीपातीचा विचार केला नाही. सर्वच समाजातील महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात ७५ हजार कोटी रुपयांची योजना सुरू केल्यात. येत्या काळात तुम्ही आम्हाला साथ द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

रद्द अर्ज पुन्हा घेणार, १० हजार पिंक रिक्षा देऊ : तटकरे
प्रस्ताविकातून महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, अडीक कोटी महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांना या योजनेत खोडा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी महिलांचे अर्जच चुकीचे भरले. त्यामुळे ५० हजार अर्ज रद्द झाले. सप्टेंबर महिन्यात हे अर्ज संबंधित महिलांना पुन्हा भरता येतील. त्याचप्रमाणे १७ महापालिकांमध्ये १० हजार पिंक रिक्षांचे वाटप होईल. नागपूर महानगर पालिकेत १४०० पिंक रिक्षा देऊ. नवरात्रीत आशा वर्करांना इंसेंटिव्ह मिळणार, असे मंत्री तटकरे म्हणाल्या.

सुरक्षेत कुठलीही तडजोड नाही
बहिणीला आर्थिक सक्षम करण्यासोबतच तिला सुरक्षाही देणार आहोत. यात कुठलीही तडजोड करणार नाही. अत्याचार करेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. गुन्हेगारास माफी नाही, असेही शिंदे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button