महाशिवरात्रीच्या उपवासाच्या पार्श्वभूमीवर शेंगदाणा, साबुदाणा आणि भगरीला मागणी
महाशिवरात्रीला अनेक जण भक्तिभावाने उपवास करतात

नागपूर : महाशिवरात्रीच्या उपवासाच्या पार्श्वभूमीवर बाजारात शेंगदाणा, साबुदाणा आणि भगरीला मागणी वाढली आहे. तरीही शेंगदाणे वगळता साबुदाणा, भगरीच्या दरात घसरण झालेली आहे. शेंगदाण्याच्या दरात वाढ झालेली आहे.
यंदा महाशिवरात्रीचा उपवास करताना खवय्यांची उपवासाची प्लेट विविध प्रकारच्या चविष्ट पदार्थांनी सजणार आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठे व्यापारी साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करतात. यंदा त्यात घसरण झालेली आहे. त्यामुळे बाजारात हवा तसा उत्साह दिसत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत घाऊक बाजारात साबुदाण्याच्या दरात क्विंटलमागे ३ ते ४ हजार रुपयांची घट झालेली आहे. शेंगदाण्याच्या दरात ३ हजार रुपयांनी वाढ झालेली आहे.
महाशिवरात्रीला अनेक जण भक्तिभावाने उपवास करतात. उपवासासाठी विविध खाद्यपदार्थ बनविण्यासाठी आवश्यक असणारा साबुदाणा, भगर आणि शेंगदाण्यांची मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी विचारात घेऊन व्यापारी साबुदाणा, शेंगदाणा, भगर खरेदी करतात. मागणीत वाढ झाल्याने शेंगदाणे महागले आहेत.
हेही वाचा : ‘नमो किसान सन्मान निधी योजनें’तर्गत ३ हजार रुपये वाढविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मात्र, साबुदाणा आणि भगरीचे दर कमी झाले आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षी साबुदाणा ८५ रुपये किलो होता. तो आता ७५ रुपयांवर आला आहे. भगर १२५ वरून ११५ रुपयांवर घसरली आहे. त्यामुळे उपवासाचे पदार्थ आवडणाऱ्या खवय्यांना महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच दिलासा मिळाला आहे.
कुठून येतो साबुदाणा?
बाजारात तामिळनाडूतून साबुदान्याची आवक होते. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधून शेंगदाण्याची आवक होते. नाशिक भागातून भगरची आवक होते. दरवर्षी जून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत शेंगदाण्याला मागणी असते. शेंगदाण्याची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली असल्याचे व्यापारी आदर्श देशमुख यांनी सांगितले. भगरीला तृणधान्य घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे भगरीच्या मागणीत वाढ झाली आहे. बाजारात भगर, साबुदाण्याची आवक चांगली आहे.