Lockdown: तलवारीने कापण्यात आलेला ‘त्या’ अधिकाऱ्याचा हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश, सात तास चालली सर्जरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Punjab-Police.jpg)
पंजाबमधील पोलीस अधिकऱ्याचा तलवारीने कापलेला हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. डॉक्टरांकडून पोलीस अधिकाऱ्यावर यशस्वी सर्जरी करण्यात आलेली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कर्फ्यू पास मागितल्याने तसंच भाजी मंडईत जाण्यापासून रोखल्याने निहंगा समुदायातील काही जणांनी पोलिसांवर रविवारी हल्ला केला. या हल्ल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक हरजीत सिंह यांचा हात तलवारीने कापण्यात आला होता.
आपला कापलेला हात घेऊन हरजीत सिंह दुचाकीवरुन रुग्णालयात पोहोचले होते. त्यांच्यावर सात तास सर्जरी केल्यानंतर डॉक्टरांना हात जोडण्यात यश मिळालं आहे. पंजबाचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून चंदिगडमधील पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ऍण्ड रिसर्च (पीजीआयएमईआर) रुग्णालयात यशस्वी सर्जरी झाल्याची माहिती दिली आहे.
“मला सांगण्यात आनंद होत आहे की, साडे सात तासांच्या प्रदीर्घ सर्जरीनंतर सहायय्क पोलीस निरीक्षक हरजीत सिंह यांचा हात जोडण्यात यश आलं आहे. मी डॉक्टरांची सर्व टीम आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानतो. प्रकृती लवकर सुधारण्यासाठी हरजीत सिंह यांना शुभेच्छा,” असं ट्विट अमरिंदर सिंग यांनी केलं आहे. ही सर्जरी डॉक्टरांसाठी प्रचंड आव्हानात्मक होती. सात तास चाललेल्या प्रदीर्घ प्लास्टिक सर्जरीनंतर डॉक्टरांना हात जोडण्यात यश मिळालं.
सहाय्यक पोलीस निरीक्षक हरजीत सिंह आणि इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर रविवारी सकाळी निहंगा समुदायातील टोळक्याकडून हल्ला करण्यात आला. भाजी मंडईत जाताना कर्फ्यू पास मागितल्याने त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्ला झाल्यानंतर त्यांनी पळ काढला होता. पोलिसांनी कारवाई करत सात जणांना अटक केली आहे. यामधील पाच जण हल्लेखोर आहेत. अटक करताना पोलीस आणि आरोपींमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात अटक करण्यात आलेला एक आरोपी जखमी झाला आहे.
हल्ल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. व्हिडीओत हरजीत सिंह मदत मागताना दिसत आहेत. यावेळी एक व्यक्ती त्यांचा तुटलेला हात उचलून देतो. यानंतर दुचाकीवरुन त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. हल्ला करण्यात आल्यानंतर आरोपी गुरुद्वारात जाऊन लपले होते. पोलिसांनी विनंती करुनही आत्मसमर्पण करण्यास त्यांनी नकार दिला. यानंतर पोलीस आणि आरोपींमध्ये गोळीबार झाला. प्रसारमाध्यमांना घटनास्थळी येण्यास बंदी घालण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे.