जामा मशिदीच्या दुरुस्तीसाठी शाही इमामांचे पंतप्रधानांना पत्र
![Letter from the Royal Imams to the Prime Minister for the repair of the Jama Masjid](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Jami-Masjid-Delhi.jpg)
नवी दिल्ली– दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मशिदेचे शाही इमाम बुखारी यांनी पंतप्रधान मोदी यांना जामा मशिदीच्या दुरुस्तीसाठी पत्र लिहिले आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या वादळामुळे मशिदिच्या एका मिनारचा स्लॅब कोसळला होता. यामुळे खालच्या फरशीचेदेखील नुकसान झाले आहे. बुखारी यांनी पडलेल्या दगडांचे, झालेल्या नुकसानाचे आणि मिनारच्या जीर्ण अवस्थेचे फोटोही पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रासोबत जोडले आहेत.
जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतीय पुरातत्व विभागाने स्मारकाची पाहणी करावी आणि आवश्यक दुरुस्तीचे काम करावे. 4 जून रोजी आलेल्या वादळात 17 व्या शतकात बांधलेल्या या ऐतिहासिक मशिदीचा एक मिनार खराब झाला आहे. त्यामुळे जामा मशिदीमध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. गेल्या 50 वर्षांपासून मिनारांच्या दुरुस्तीसाठी कोणतेही काम करण्यात आले नाही. दुरुस्तीचे काम कधीकधी करण्यात येते पण मशिदिची आता भारतीय पुरातत्व विभागाने पाहणी करणे आवश्यक आहे. स्मारकाचे अनेक दगड जीर्ण अवस्थेत आहेत आणि बर्याचदा ते खाली पडतात. कालदेखील मिनारवरुन काही दगड पडले, परंतु लॉकडाऊनमुळे मशिद बंद असल्याने मोठा अपघात टळला, असे बुखारी यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या ऐतिहासिक जामा मशिदीची देखभाल करण्याची जबाबदारी दिल्ली वक्फ बोर्डावर आहे. ही मशिद मुघल शासक शाहजानने 1665 मध्ये बांधली होती.