कोलकात्यातून अपहरण करून आणले अन् देहव्यापारात ढकलले; ब्रह्मपुरीतील दाम्पत्याच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका
![Kidnapped from Kolkata and forced into prostitution; A minor girl was rescued from the clutches of a couple in Brahmapuri](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/9a5daaa3-e05f-4869-8ef4-9f69725b6d63-780x461.jpg)
देहव्यापारासाठी कोलकाता येथून अपहरण केलेल्या १४ वर्षीय मुलीची ब्रम्हपुरी शहरातून सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत ब्रम्हपुरी येथील मंजित रामचंद्र लोणारे (४०), चंदा मंजित लोणारे (३२) या दाम्पत्याला अटक केली.
अल्पवयीन मुलीला जबरदस्ती देहव्यापारात ढकललं
नागपुरातील एका सामाजिक संस्थेने चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे बाहेरून आणलेल्या अल्पवयीन मुलीकडून ब्रह्मपुरी शहरात देहव्यापार करून घेतला जात असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी ब्रम्हपुरी येथील मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेट कॉलनी बंगला क्रमांक १४ येथे बनावट ग्राहक पाठवला. तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर या बनावट ग्राहकाने इशारा करताच बंगल्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी कोलकाता तेथे कोलकात्यातील एक अल्पवयीन मुलगी आढळून आली. कोलकात्यातून अपहरण करून तिला देहव्यापारासाठी येथे आणल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्या मुलीची सुटका केली.
दाम्पत्याला अटक
याप्रकरणी मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेटमध्ये वास्तव्यास असलेल्या मंजित रामचंद्र लोणारे, चंदा मंजित लोणारे या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या मुलीला प्रथम नागपुरात विकले होते, त्यानंतर तिला ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.