महात्मा गांधींना शिवीगाळ करणाऱ्या कालीचरण महाराजांना अटक
![Kalicharan Maharaj arrested for insulting Mahatma Gandhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/mumbaitak_2021-12.jpg)
खजुराहो – रायपूर येथील धर्म संसदेत महात्मा गांधींवर अतिशय शिवराळ भाषेत टिप्पणी करणाऱ्या कालीचरण महाराज यांना अखेर अटक करण्यात आली आहे. यापूर्वी ते फरार असल्याचे सांगण्यात येत होते. आता मिळालेल्या माहितीनुसार, कालीचरण महाराज यांना रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून अटक केली आहे. आता आरोपी कालीचरण यांना खजुराहो येथून रायपूरला आणण्याची कारवाई सुरू आहे.
महात्मा गांधींबद्दल अत्यंत शिवराळ भाषेत टिप्पणी केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्यावर रायपूरसह देशातील अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल (29 डिसेंबर) संध्याकाळीच कालीचरण महाराज रायपूरहून पळून गेल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर रायपूर पोलिसांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात त्यांचा शोध सुरू केला होता. अखेर आता त्यांना खजुराहो येथून अटक करण्यात आली आहे.
कालीचरण महाराजांविरुद्ध रायपूरमध्ये कलम 505 (2) आणि कलम 294 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. रायपूरचे माजी महापौर आणि विद्यमान सभापती प्रमोद दुबे यांनी त्यांच्याविरोधात FIR दाखल केला होता.
कालीचरण महाराज यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं?
रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द उच्चारले होते. ते म्हणाले होते, ‘राजकारणातून राष्ट्र काबीज करणे हे इस्लामचे ध्येय आहे. आमच्या डोळ्यांसमोर त्यांनी 1947 मध्ये ते ताब्यात घेतले… त्यांनी यापूर्वी इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. नंतर त्यांनी राजकारणातून बांगलादेश आणि पाकिस्तान काबीज केले होते… मी मोहनदास करमचंद गांधींची हत्या केल्याबद्दल मी नथुराम गोडसेला सलाम करतो.’ असं वक्तव्य करताना कालीचरण यांनी गांधींजीबाबत शिवराळ भाषेचा वापर केला होता.
महंत रामसुंदर दास यांनी सोडला होता मंच
कालीचरण यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, काँग्रेसचे माजी आमदार आणि छत्तीसगड गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष महंत रामसुंदर दास म्हणाले की, ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राष्ट्रपिताविरुद्ध असे अपमानास्पद शब्द वापरले जाऊ नयेत.’
दास म्हणाले, ‘ज्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तो मार्ग हरवला आहे. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महात्मा गांधींना देशद्रोही ठरवले जात आहे. मला आयोजकांना विचारायचे होते की त्यांनी असा आक्षेप का घेतला नाही? मला माफ करा, पण मी या कार्यक्रमातून स्वत: माघार घेत आहे.’ त्यानंतर दास स्टेजवरून निघून गेले.