जपान मंगळाच्या चंद्रावरून आणणार मातीचे नमुने, २०२४ला मोहिम सुरू
टोकियो – मंगळाला एकूण दोन चंद्र आहेत. फोबोस आणि डेमोस अशी त्यांची नावे आहेत. जपानच्या ‘जाक्सा’ या अंतराळ संस्थेचे यान २०२४ साली मंगळाच्या फोबोसवरून माती गोळा करून आणणार आहे तर डेमोसच्या जवळून जाणार आहे. २२ किमी व्यासाच्या फोबोसच्या सूर्याकडील भागाचे तपामान उणे चार, तर अंधारातील भागाचे तापमान उणे १८० अंश सेल्सिअस इतके कमी आहे. मंगळापासून ६ हजार किमी अंतरावरून तो प्रदक्षिणा घालतो. फोबोसच्या पृष्ठभागावरील मातीपैकी ०.१ टक्के माती मंगळावरून येते, असे जपानच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जपान आपली ही मोहीम २०२९ मध्ये पूर्ण करून दाखवणार आहे.
मंगळावर सातत्याने अतिविशाल स्वरुपाचे धुळीचे वादळ तयार होत असतात. या वादळांमुळे उडालेली माती मंगळाच्या चंद्रापर्यंत पोहोचते. जाक्सा फोबोसवरून १० ग्रॅम म्हणजेच ०.३५ औस माती पृथ्वीवर आणणार आहे. या मातीच्या अभ्यासावरून मंगळ ग्रहाच्या उत्पत्तीचे गुढ उकलेल. याशिवाय मंगळावर कधीकाळी सजीवसृष्टी होती का, याचा छडा लावण्यातदेखील यश मिळेल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मंगळावरील जेझेरो नामक खड्डा लाखो वर्षांपूर्वी पाण्याने भरलेला तलाव होता, असे मानले जाते. त्यामुळे नासा आणि युरोपीयन अंतराळ संस्था या खड्ड्याच्या अवतीभोवतीच सजीवसृष्टीचे संकेत शोधत आहेत. अमेरिका आणि चीन मंगळ ग्रहावर रोव्हर उतरवण्यात यशस्वी ठरले असले तरी या ग्रहावरून दगड-मातीचे नमुने आणण्यात अद्याप हे देश यशस्वी ठरलेले नाहीत. याबाबतीत जपान आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असून २०२९ पर्यंत मंगळाच्या चंद्रावरील मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्याची मोहिम जपानने आखली आहे. मंगळ ग्रहाच्या फोबोस नामक चंद्रावर यान पाठवण्याची जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी अर्थात जाक्साची योजना आहे. जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेचे मार्शियन मून्स एक्सप्लोरेशन म्हणजे एमएमएक्स यान २०२४ साली या मोहिमेवर रवाना होईल. २०२९ मध्ये हे यान फोबोसवरील मातीचे नमुने घेऊन पृथ्वीवर परतेल, असे या मोहिमेचे संचालक यासुहिरो कवाकात्सु यांनी गुरुवारी सांगितले.
अमेरिका आणि चीनने मंगळावर यान उतरवण्यात आघाडी घेतली असली तरी परतीच्या त्यांच्या मोहिमांच्या आधी आपली मोहिम पार पाडण्याचा जपानचा प्रयत्न आहे. सध्या अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचा पर्सेव्हेरन्स हा रोव्हर मंगळावर मातीचे नमुने गोळा करत आहे. या रोव्हरने ३१ नमुने एकत्र केले आहेत. २०३१ साली युरोपीयन अंतराळ संस्थेच्या मंगळ यानाच्या मदतीने हे नमुने पृथ्वीवर आणण्यात येणार आहे. चीनदेखील २०३०च्या अखेरिस मंगळवरील नमुने आणण्यासाठीची मोहिम राबवण्याकरिता प्रयत्नशील आहे. मात्र त्यापूर्वीच आपली मोहिम पार पाडून आघाडी घेण्याची योजना जपानने आखली आहे. जपानची ही मोहिम यशस्वी झाली तर अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला देश ठरेल. यापूर्वी जपानने पृथ्वीपासून ३०० किमी अंतरावरील रयुगु नामक लघुग्रहावरून यशस्वीरित्या मातीचे नमुने आणले आहेत. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात जाक्साचे हायाबुसा-२ हे यान या लघुग्रहावरून ५ ग्रॅम माती घेऊन पृथ्वीवर परतले होते. लघुग्रहावरील नमुने आणणारा जपान हा जगातील पहिला देश आहे.