जम्मू-काश्मीर: भूसुरूंग स्फोटात दोन जवान शहीद, तीन जण जखमी
![Jammu and Kashmir: Two killed, three injured in landmine blast](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/Untitlegfdhfdhgd-1320211030164408.jpg)
जम्मू-काश्मीर |
जम्मू-काश्मीरच्या नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ शनिवारी भूसुरुंग स्फोट झाला. या स्फोटात दोन जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. सूत्रांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंगावर गस्त घालत असताना स्फोट झाला आणि त्यात एक अधिकारी आणि एक जवान शहीद झाला. माहिती मिळताच इतर जवान घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले. जखमी तिघांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या घटनेची एका वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील पुष्टी केली आहे.
जम्मूच्या संरक्षण प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, “नौशेरा सेक्टरमधील परिसरात गस्त घालत असताना भुसुरुंग स्फोट झाला, ज्यात भारतीय लष्कराचे दोन जवान गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. तर, इतर जखमी सैनिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत शहीद झालेले लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत बहादूर हे अतिशय शूर आणि मेहनती होते. या दोघांनी देशासाठी बलिदान दिले आहे. या दोन्ही शूर जवानांच्या सर्वोच्च बलिदानासाठी देश आणि भारतीय लष्कर सदैव ऋणी राहील. दरम्यान, लेफ्टनंट ऋषी कुमार हे बिहारमधील बेगुसरायचे रहिवासी होते, तर शिपाई मनजीत सिंग सिरवेवाला हे पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी होते,” असं त्यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह नऊ जवान शहीद झाले होते. दहशतवादी पुंछच्या जंगलात लपले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नौशेरा सेक्टरमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून लष्कराची शोधमोहीम सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लष्कराचे जवान या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. मागच्या काही वर्षातील ही सर्वात मोठी चकमक आणि शोधमोहीम असल्याचं म्हटलं जातंय.