उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादवांचे सरकार आल्यास १० रुपयांत समाजवादी थाळी
![If Akhilesh Yadav's government comes in Uttar Pradesh, socialist plate for 10 rupees](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/navbharat-times.webp)
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास दहा रुपयांत समाजवादी थाळी देऊ, अशी घोषणा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच ३०० युनिट मोफत वीज, समाजवादी पेन्शन योजनादेखील राज्यात लागू केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
अखिलेश यादव आणि आरएलडीचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. अखिलेश यादव यांनी यावेळी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, भाजपाने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. भाजपाला शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वाकावे लागले आणि कृषी कायदे परत घ्यावे लागले. शेतकऱ्यांचा भावना भाजपाला समजत नसल्याची टीका त्यांनी केली. देशातील ८० कोटी लोकांना अन्नधान्य देत असल्याचे केंद्र सरकार सांगत आहे, परंतु ८० कोटी लोकांना बेरोजगार केले, हे ते का सांगत नाहीत. यावेळी अखिलेश यादव यांनी ‘बंधुभाव जिंदाबाद, आमची ताकद बंधुभाव’ अशी घोषणा केली. तसेच उत्तर प्रदेशात सरकार आल्यास गाझियाबाद येथे स्वच्छतेसाठी विशेष व्यवस्था केली जाईल आणि ही व्यवस्था दिल्लीतदेखील नसेल, असा दावा केला. समाजवादी पक्षाने मेट्रोसाठी जेवढी मेहनत घेतली, तेवढी अन्य पक्षाने केलेली नाही, असेही ते म्हणाले.