प्रसिद्धी मिळवणारा वकील मला नको, दहशतवादी तहव्वूर राणाची न्यायालयाकडे विनंती

नवी दिल्ली : माझ्या नावाचा फायदा घेऊन प्रसिद्धी मिळवू इच्छिणारा वकील मला नको, अशी विनंती दहशतवादी तहव्वुर राणाने केल्याचे पतियाळा न्यायालयाच्या आदेशात समोर आले आहे. गुरुवारी, राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. त्यानंतर पतियाळा न्यायालयाने त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या आदेशात वकीलासंबंधीची राणाची विनंती निदर्शनास आली आहे. या प्रकरणात पियूष सचदेवा हे तहव्वुर राणाचे वकील आहेत.
पतियाळा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रजीत सिंह यांनी त्यांच्या आदेशात म्हटले की, ‘आरोपींनी म्हटले आहे की, असा कोणताही वकील नसावा जो नाव आणि प्रसिद्धी मिळवत असल्याचे दिसून येईल.’ कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा, १९८७ मध्ये तरतूद अस्तित्वात असली तरी, आरोपीची विनंती मान्य करण्यात आली आहे. राणाच्या वकिलांनी आरोपीबद्दल माध्यमांशी बोलू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राणाचे वकील माध्यमांशी बोलू शकणार नाहीत. तहव्वुरने वकिलांशी बोलण्यासाठी पेन आणि कागदाची मागणीही केल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार त्याला मऊ टोकाचा पेन आणि कागद देण्यात यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले
हेही वाचा – देशभरात UPI व्यवहार ठप्प; त्वरित करा ‘हे’ उपाय
एनआयए मुख्यालयात राणाची चौकशी सुरु आहे. त्यामुळे मुख्यालयामध्ये आणि भोवतालच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सीआयएसएफ कर्मचारी आणि एनआयए अधिकारी २४ तास पहारा देत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एनआयए मुख्यालयाच्या कॅन्टीनमधून राणाला जेवण आणि आवश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.