पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विमानातील गोंधळाप्रकरणी हायकोर्टाचे केंद्राला आदेश
![High Court orders Center to probe West Bengal Chief Minister Mamata Banerjee's plane crash](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Mamata-Flight.jpg)
कोलकाता | काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विमान अपघातातून थोडक्यात बचावल्या होत्या. दोन विमाने समोरासमोर आल्याने त्यांची टक्कर होता होता टळली होती. मात्र या घटनेत ममता बॅनर्जी यांच्या छातीला आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती विधानसभेतील अधिवेशन काळात दिली होती. आता याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने केंद्राला जाब विचारत दोन आठवड्यात आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ३पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयाने सुनावणी दरम्यान हे आदेश दिले आहेत.
त्याचप्रमाणे कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या विमानात गोंधळ निर्माण होणे हा काही विनोदाचा भाग नाही, यावर डीजीसीए आणि संबंधित विभागाची भूमिका काय आहे? याबाबत केंद्र सरकारने स्थिती स्पष्ट करणारे शपथपत्र सादर करावे. दरम्यान, आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे तृणमूल कॉंग्रेसचे महासचिव कुला घोष यांनी म्हटले आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी होणार आहे. ममता बॅनर्जी गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होत्या. उत्तर प्रदेशातील प्रचार संपवून परत येत असताना हा संभाव्य अपघाताचा प्रकार घडला. विमानाच्या पायलटच्या समयसूचकतेने ही मोठी दुर्घटना टळल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. त्यांच्या विमानासमोर दुसरे एक विमान आले होते. किमान १० सेकंद तशीच परिस्थिती राहिली असती तर या दोन्ही विमानांची टक्कर झाली असती. मात्र ममताजी यांच्या विमानाच्या पायलटने आपले विमान तत्काळ ६ हजार फुट खाली घेतल्याने पुढील घटना टळली होती. मात्र यात ममताजी यांच्या पाठीला आणि छातीला दुखापत झाली होती असे ममताजी यांनीच सांगितले होते.