खूशखबर! उद्या केंद्र सरकारतर्फे 19 हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा
![Provision of guarantee in state agriculture bill! Three years imprisonment for cheating farmers!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Farmer-e1620892785795.jpg)
नवी दिल्ली – पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे आर्थिक लाभ मिळत असतो. त्यातच कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत असलेल्या आठव्या हप्त्याची रक्कम उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करतील आणि त्यानंतर ते आठवी हप्त्याची रक्कम खात्यात जमा करतील अशी माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधानांशी संपर्क साधण्यासाठी शेतकऱ्यांना pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावर जाऊन किंवा दूरदर्शनच्या माध्यमातूनही संपर्क साधता येऊ शकतो. उद्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 19 हजार कोटी रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. आतापर्यंत 7 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 14 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.
14 फेब्रुवारी 2019 ला ही योजना सुरू करण्यात आली असून सुरुवातीला 3 कोटी 16 लाख 5 हजार 539 शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा हप्ता दिला गेला होता. आतापर्यंत 10 कोटींपेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला असून डिसेंबरमध्ये 10 कोटी 70 हजार 978 शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 2 हजार रुपये प्रत्येकी प्रमाणे आर्थिक लाभ देण्यात आला आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये केंद्र सरकारतर्फे जमा करण्यात येतात. उद्या सकाळी 11 वाजता शेतकर्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करतील. त्यामुळे, आता शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांची आर्थिक मदत या कठीण काळामध्ये मिळणार असल्याने काही प्रमाणात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.