स्टेटमेंट : देवा-राज भेटी मागं नेमकं दडलय काय ?

दोन दिवसांपूर्वी सकाळी सकाळी बातमी येऊन धडकली, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘मनसे’ चे नेते राज ठाकरे यांच्या घरी चक्क नाश्त्याला पोहोचले. घरोघरी अजून नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे नाश्ते झाले नव्हते, त्यावेळी देवाभाऊ आणि राजसाहेब एकत्र नाश्ता घेत होते, गप्पा मारत होते, भविष्यातील राजकारणाचा वेध घेत असावेत !
‘महायुती’ मधील धुसफूस महत्वाची
या महत्वपूर्ण भेटीबदल राजकीय वाद, तर्कवितर्क लढवले जात असतानाच ‘उबाठा’ गटाचे तीन नेते त्याच दिवशी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळूनही ‘महायुती’ त मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली धुसफूस, हे या गाठीभेटींचे कारण तर नाही ना अशी एक नवीनच चर्चा सुरू झाली. ठिकठिकाणच्या पालकमंत्रिपदावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद असल्याचं सांगितलं जात आहे. ‘महायुती’ त सुरू असलेल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दोन बैठका घेतल्या आहेत, या मागचा अर्थ काय तो ओळखा!
भाजपच्या मनात काय ?
महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष म्हणून स्वतःला स्थापित कराण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांच्या नेत्यांच्या मनात काय हे ओळखण्याची आता गरज आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिका भाजपासाठी अत्यंत महत्वाची आहे. या निवडणुकीच्या संदर्भातही फडणवीस यांच्या हालचालींकडे पाहिले जात आहे. गेल्या अनेक दशकांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत मुंबईवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकणार, अशी भाजपा नेत्यांना आशा आहे, तशी त्यांची तीव्र इच्छाही आहे.
हेही वाचा : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मिळाला नवा कर्णधार, जाणून घ्या RCB चा संपूर्ण संघ
येत्या काही महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वतंत्रपणे लढवणार आहोत, असं महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आधीच सूचित केलं आहे. तर दुसरीकडे फडणवीस यांच्या जवळच्या सुत्रानी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मित्रपक्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लाढण्याचा संदेश दिला आहे. शिवसेनेने नकार दिला, तर भाजपासमोर पर्याय उपलब्ध असल्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, हे पण भेटीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहे.
राजकीय चर्चा नव्हती..
दरम्यान, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे भाजपा नेत्याने सांगितले. विधानसभा निवडणुकीत प्रचंड पश मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी फडणवीसांचे फोनवरून अभिनंदन केले होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीचे आश्वासन दिले होते, असेही भाजप नेत्याने स्पष्ट केले आहे. मात्र, असं असलं तरी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत भाजपाच्या प्रचंड विजयावर प्रक्षचिन्ह उपस्थित केलं होतं, हे सुद्धा अगदी ताजं उदाहरण आहे.
मुद्दा अमित यांच्या आमदारकीचा
राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा माहीम मतदारसंघात पराभव झाला आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये भाजप कोट्यात काही जागा आहेत. अमित यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार माणून विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे, याची चर्चा होत आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट..
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर ठाकरे गटाचे तीन नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘सागर’ बंगल्यावर दाखल झाले होते. यामध्ये मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा समावेश होता. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी ही भेट होती, असं या नेत्यांकडून सांगण्यात आलं. दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत हे गेल्या काही दिवसांपासून उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज असल्याची चर्चा होती. त्यांचे एक पत्र सार्वजनिक झाल्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली, यामध्ये त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सामंत यांच्या माहितीशिवाय निर्णय घेऊ नका, असे निर्देश दिले होते, यावर चर्चा झाली नसेल ना ?
खरोखर नाष्टा का बंद दारा आणि चर्चा
देवेंद्रजी आणि राज साहेब यांच्या भेटीच्या वेळी नाश्ता हेच खरोखर कारण होते का आणखी काही मुद्दे होते, त्या भेटी मागे नेमकं दडलंय काय, याची चर्चा मात्र अनेकांना भेडसावत आहे. मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक, अमित ठाकरे यांची आमदारपदी वर्णी, निवडून आल्यानंतर नाश्त्याला येण्याचे आश्वासन या तीन मुद्द्यांभोवती चर्चा फिरत आहे. देवेंद्र फडणवीस हे राजकारणाच्या सारीपाटावरील चाणक्य मानले जात आहेत. सर्वसामान्याला या तीन मुद्द्यांभोवती फिरत ठेवून चौथीच खेळी करायची, हे तर त्यांच्या मनात नाही ना ? पाहू या.. राजकारण रोजच उलट सुलट पद्धतीने कोलांटउड्या घेत आहेत, फडणवीस यांच्या डावामुळे कोणावर उड्या मारण्याची वेळ येते, ते लवकरच समजेल!